मुंबई : बिग बॉस चवीने पाहणारे जितके चाहते आहेत, तितकेच या शोला नाव ठेवणारे, बिग बॉस स्क्रिप्टेड असल्याचा आरोप करणारे प्रेक्षकही आहेत. 'बिग बॉस'च्या घरात जुळणारे प्रेमसंबंध प्रेक्षकांना नवीन नाहीत. मात्र 'बिग बॉस तमिळ'मध्ये घडलेला प्रकार कदाचित नवीनच आहे. अभिनेता महत राघवेंद्र आणि अभिनेत्री याशिका आनंद या दोघा स्पर्धकांमधील वाढत्या जवळीकीमुळे महतची गर्लफ्रेण्ड प्राची शर्माने त्याच्यासोबत ब्रेकअप केलं. मात्र काही तासातच ही पोस्ट तिने डिलीटही केली.

तामिळ अभिनेता महत आणि मॉडेल-अभिनेत्री प्राची शर्मा यांचे प्रेमसंबंध जगजाहीर आहेत. 'बिग बॉस तमिळ'चा दुसरा सिझन सुरु आहे. महतने शोमध्ये प्रवेश करतानाच आपली गर्लफ्रेण्ड प्राचीचा उल्लेख केला होता. आपण प्राचीला मिस करु, असंही तो म्हणाला होता. कॅमेराशी बोलत सुरुवातीच्या काळात तो प्राचीशी गप्पाही मारायचा.

बिग बॉसच्या घरात जसजसे दिवस सरत गेले, तशी याशिका आणि महतमधील जवळीक वाढताना दिसली. स्पर्धेत सहभागी असलेले इतर सदस्य, चाहते यांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. मंगळवारच्या भागात तर कहर झाला. महतने आपण याशिकाच्या प्रेमात पडल्याची कबुली दिली. मात्र प्राचीही आपल्या मनात असल्याचं त्याने सांगितलं.

एपिसोड टेलिकास्ट झाल्यावर प्राचीच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर सहानुभूती दाखवली. त्यानंतर प्राचीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आणि आपण महतशी ब्रेक अप करत असल्याचं जाहीर केलं.

बिग बॉसच्या घरात शिरताना महतने प्राचीवर आपलं किती प्रेम आहे, हे सांगतानाचा व्हिडिओ प्राचीने शेअर केला. 'महत अशाप्रकारे बिग बॉसच्या घरात गेला होता. माझं ज्याच्यावर प्रेम आहे, त्याला मी आत पाठवलं. बिग बॉसच्या वेळेनुसार आम्ही आमच्या आयुष्यातील गोष्टीत बदल केले. मला सहानुभूतीचे मेसेज पाठवणाऱ्यांना समजावं यासाठी मी माझं वैयक्तिक आयुष्य जाहीर करत आहे. तो प्रेमात होता आणि मी अजूनही.... आता मी त्याच्या सोबत नाही. पण मी त्याला प्रत्यक्ष भेटेन आणि सगळ्या गोष्टींवर चर्चा करेन' असं प्राची म्हणते.

'तो याशिकाच्या प्रेमात आहे आणि आता हे उघड झालं आहे. पण मी दुखावले गेले आहे. मी माझी काळजी घेईन. तो मुमताझशी वाईट वागला आणि तो त्याची एकमेव हितचिंतक जननीच्या पाठीशी उभा राहिला नाही. तुम्हा सर्वांना विनंती आहे, मला त्याच्याबद्दल काहीही विचारु नका. तुमच्या काळजीबद्दल आभार. मी महत सोबत नाही, माझं सोशल मीडिया सोडा' असंही प्राचीने पुढे स्पष्ट केलं.



ब्रेकअपची पोस्ट काही तासांनंतर प्राचीने डिलीट केली. त्यामुळे प्राची आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करत असावी, अशी आशा चाहत्यांनी व्यक्त केली आहे.