मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो 'कौन बनेगा करोडपती' लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी केबीसीच्या दहाव्या पर्वाच्या शूटिंगला सुरुवातही केली आहे. विशेष म्हणजे 'कौन बनेगा करोडपती'मध्ये समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि डॉ. मंदाकिनी प्रकाश आमटे उपस्थित राहणार आहेत.

खुद्द अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरुन याची माहिती दिली. "डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे या दोन विलक्षण माणसांचा सहवास लाभणं ही सन्मानाची बाब आहे. कोणीही विचार करु शकत नाही असं त्यांचं आयुष्य आणि आदिवासींसाठी केलेलं काम आहे. केबीसीच्या कर्मवीर भागासाठी ते माझ्यासोबत होते," असं ट्वीट अमिताभ बच्चन यांनी केलं आहे.


त्याबरोबरच विकास आमटे यांनीही ट्विटरच्या माध्यमातून 7 सप्टेंबरला हा शो नक्की पाहण्याचं आवाहन केलं आहे. 'केबीसी'च्या दहाव्या पर्वामध्ये डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे पहिल्यांदाच हॉट चेअरवर बसणार आहेत.


केबीसीच्या हॉट चेअरवर सामान्य नागरिकांसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली आहे. त्यामुळे आता समाजसेवक प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे हे या कार्यक्रमात उपस्थिती लावून रंगत वाढवणार आहेत.

'कौन बनेगा करोडपती' हा प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय शो 'हू वॉन्ट्स टू बी अ मिलेनिअर'चं हिंदी व्हर्जन आहे. आतापर्यंत झालेल्या 9 पैकी 8 पर्वांमध्ये अमिताभ बच्चन होस्ट होते. तर तिसऱ्या पर्वात शाहरुख खान होस्ट होता. केबीसीचा दहावा पर्व 30 एपिसोडचा असेल.