Bigg Boss Marathi Suraj Chavan : 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमधील (Bigg Boss Marathi New Season) पहिला आठवडा सदस्यांनी चांगलाच गाजवला. पहिल्याच आठवड्यात पुरुषोत्तमदादा पाटील घराबाहेर पडले. शोचा होस्ट रितेश देशमुखने 'भाऊच्या धक्क्या'वर घरातील सदस्यांना फैलावर घेत त्यांच्या चुका दाखवून दिल्या. त्यामुळे आता दुसऱ्या आठवड्यात घरातील सगळे सदस्य अॅक्टिव्ह मोडवर असणार आहेत. या आठवड्यात बिग बॉस कॅप्टन्सी आणि नॉमिनेशनसाठी टास्क देणार आहे. त्यामुळे हा टास्क काय असणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष असणार आहे. या दरम्यान, आता अरबाज पटेलच्या (Arbaz Patel) निशाण्यावर सूरज चव्हाण आला आहे. अरबाजने थेट सूरजच्या बीबी करन्सीवर डल्ला मारला आहे.
पहिल्या आठवड्यात शांत असणारे सदस्य आता भिडणार आहेत. गुलिगत सूरज चव्हाण (Suraj Chavan) आता अॅक्टिव्ह झाला असून त्याचा आणि जान्हवी किल्लेकरचा (Jahnavi Killekar) जोरदार वाद झाला आहे. 'बिग बॉस मराठी'च्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने काही सदस्यांची चांगलीच शाळा घेतली. त्यामुळे या आठवड्यात हे सदस्य कसा खेळ खेळणार? खेळ खेळताना एकमेकांसोबत कसे वागणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
बिग बॉसच्या घरात चोरी?
'बिग बॉस मराठी'च्या घरात नवीन सीझनने नवा ट्विस्ट घेतला आहे. घरात सध्या दोन गट पडले आहेत. नुकत्याच आलेल्या प्रोमोत बिग बॉसच्या घरात चोरी झाली असल्याचे दिसून आले आहे. प्रोमो व्हिडीओनुसार, रात्री सूरज झोपला असताना अरबाज हा सूरजकडील 30 हजार बीबी करन्सी चोरून आपल्या प्रोटीन पावडरच्या डब्यात ठेवत असताना दिसत आहे. अरबाजने हे काम सूरज गाढ झोपेत असताना केले आहे. अरबाजने केलेली चोरी नेमकी कशासाठी आहे, या घटनेने घरातील वातावरणावर परिणाम होणार का? आपल्याकडील बीबी करन्सीची चोरी झालीय हे सूरजला कधी आणि कसे कळणार आणि बिग बॉस आता पुढे अरबाजला काय शिक्षा देणार? हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.
निक्की अन् अरबाजमध्ये बाचाबाची
अरबाज (Arbaz Patel) आणि निक्की (Nikki Tamboli) यांच्या प्रेमाच्या चर्चाही पहिल्या आठवड्यात रंगल्या. पण आता याच मैत्रीमध्ये वादाची पहिली ठिणगी पडली असल्याचे दिसून आले आहे. निक्की अरबाजला समजावत असताना अरबाजचा आवाज वाढतो, त्यावेळी निक्की त्याच्यावर चांगलीच भडकते. त्यामुळे या दोघांमध्ये वादाची पहिली ठिणगी पडते. दरम्यान घन:श्याम, जान्हवी आणि वैभव या दोघांनाही समजवण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणूनच आता ज्यांची मैत्री जुळली होती, त्यांच्यातही आता वादाला तोंड फुटलं आहे.