Bigg Boss Marathi Runner-up Abhijeet Sawant : काही दिवसांपूर्वी बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi) ग्रँड फिनाले सोहळा पार पडला. यंदाच्या पर्वाची ट्रॉफी बारमतीचा झापुक झुपूक स्टार सूरज चव्हाण (Suraj Chavhan) यानं उंचावली. तर, रनरअप ठरला अभिजीत सावंत (Abhijeet Sawant). बिग बॉसचा रिझल्ट अनाउंस झाल्यानंतर, सोशल मीडियावर अभिजीतसाठी अनेक नेटकरी एकवटले आणि त्यांनी अभिजीतला धीर देण्याचा प्रयत्न केला. विनर कुणीही असो, आमच्यासाठी विनर तूच, तूच खरा जेंटलमन, अभिदा तू संपूर्ण महाराष्ट्राची मनं जिंकलीत... अशा अनेक पोस्ट अभिजीत सावंतसाठी सोशल मीडियावर पाहायला मिळाल्या. पण, अनेकांच्या मनात अभिजीतला ट्रॉफी उंचावता आली नाही, याची खंत होती. पण अखेर महाराष्ट्राच्या ट्रू जेंटलमनला एक खास ट्रॉफी मिळाली आहे. अभिजीत मानाची ट्रॉफी उंचावू शकला नाही, पण त्यानं एक लय भारी ट्रॉफी उंचावली आहे. ही ट्रॉफी खुद्द बिग बॉस मराठी सीझन 5 चा होस्ट आणि महाराष्ट्राचा लाडका भाऊ रितेश देशमुखनं अभिजीतला दिली आहे.
सूरजला मानाची, तर अभिजीतला लय भारी ट्रॉफी
बिग बॉस मराठी सीझन 5 चा रनरअप अभिजीत सावंतनं आपल्या इंन्स्टाग्राम हँडलवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिजीतच्या हातात एक लय भारी ट्रॉफी दिसत आहे. ती ट्रॉफी रितेशनं दिल्याचं अभिजीतनं सांगितलं. अभिजीतनं रितेशनं दिलेल्या ट्रॉफीचा व्हिडीओ शेअर करत एक खास कॅप्शन लिहिलं आहे, "खूप खूप धन्यवाद रितेश भाऊ… तुम्हाला माझा गेम आवडला. मी तुमचं मन जिंकलं याचा मला खूप आनंद आहे आणि ही लय भारी ट्रॉफी तुम्ही मला दिली त्यासाठी मनापासून आभार."
अभिजीतनं इन्स्टावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे की, "भले माझ्या हातात ट्रॉफी आली नसेल. पण ही एक ओळख, आठवण म्हणून रितेश भाऊंनी ट्रॉफी मला दिली. देताना ते म्हणाले की, एक असा व्यक्ती, ज्याने योग्यपद्धतीने आपला 'बिग बॉस'चा प्रवास पूर्ण केला. सुसंस्कृत पद्धतीनं 'बिग बॉस'चा खेळ खेळला आणि खूप प्रामाणिक होता. ज्याने फक्त लोकांचं नाही तर माझं मन जिंकलं. त्यामुळे त्यांनी मला 'लय भारी' पुरस्कार दिला आहे."
व्हिडीओत बोलताना पुढे अभिजीत म्हणाला की, "ही ट्रॉफी साधी असेल. पण जे शब्द त्यांनी माझ्यासाठी संबोधले. त्यासाठी मी त्यांचा खूप आभारी आहे. एक माणूस म्हणून मी या घरात आपलं अस्तित्व एक चांगल्या पद्धतीनं टिकवू शकलो. याचा मला अभिमान आहे. लोक कितीही काहीही म्हणू दे… मला माहितीये खरी गोष्ट काय आहे." त्यानंतर अभिजीतनं रितेश आणि जिनीलिया यांच्या 'वेड' चित्रपटाच्या शीर्षक गीतामधील काही ओळी गायल्या.
दरम्यान, सूरज विजेचा ठरल्यानंतर त्याच्यावर बक्षिसांचा पाऊस पडला. तर, सहाव्या आलेल्या जान्हवीनं 9 लाखांची बॅग घेतली. पण, रनरअप ठरलेल्या अभिजीत सावंतला फक्त एक लाखांचं व्हाउचर दिल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर सोशल मीडियावर याबाबत बऱ्याच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं. पण, आता अभिजीतला मानाची ट्रॉफी मिळाली नसली तरी, लय भारी ट्रॉफी उंचावण्याचा मान मिळाला आहे. त्यामुळे अभिजीतनं शेअर केलेल्या व्हिडीओवर चाहत्यांकडून भरभरुन लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
मी आज बारामतीत, भेटूया का? अजित पवारांचा सूरजला चव्हाणला फोन, सूरज म्हणाला, प्रयत्न करतो...