Bigg Boss Marathi Season 5 Latest Updates : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएल्टी शो 'बिग बॉस मराठी'ची (Bigg Boss Marathi) उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. 'बिग बॉस मराठी'च्या यंदाच्या सीझनचे होस्टिंग अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) करणार आहे. दिग्दर्शक-निर्माते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्याऐवजी रितेश या शोमध्ये झळकणार असल्याने उत्सुकता वाढली आहे. 'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो नुकताच आऊट करण्यात आला. मात्र, या प्रोमोवर चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. प्रोमोच्या व्हिडीओ खाली कमेंट्स करून चाहत्यांनी संतापाला वाट मोकळी करुन दिली आहे.
'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या प्रोमोमध्ये रितेश भाऊची 'लयभारी' स्टाईल पाहायला मिळाली होती. रितेशच्या एन्ट्रीने या सीझनची उत्सुकता वाढली गेली. आता नव्या प्रोमोमध्येही रितेशचा स्वॅग दिसला. 'बिग बॉस'च्या घरात आतापर्यंत ज्या पद्धतीने गेम प्लॅन, टास्क स्पर्धक खेळले. त्याप्रकारे या पर्वातील स्पर्धकांना खेळता येणार नाही. कारण स्पर्धकांचे प्लॅन तोडायला रितेश सज्ज असल्याचे प्रोमोमध्ये दिसले.
चाहत्यांचा संताप का?
एका मोठ्या गॅपनंतर बिग बॉस मराठीचा सीझन यंदा येत आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.अशातच कलर्स मराठी वाहिनीकडून या शोबाबत अद्याप बिग बॉसची तारीख जाहीर केली जात नाही. बिग बॉस मराठीचे प्रोमो येत असले तरी तारीख जाहीर करायला काय हरकत आहे, असा सवाल चाहत्यांनी केला आहे. एका युजरने म्हटले की, ''एखादा व्यक्ती तुमच्यावर प्रेम करतो त्याची इतकी परीक्षा बघू नका.'' तर दुसऱ्या युजरने म्हटले की, ''खुप मोठी गद्दारी करताय तुम्ही प्रेक्षकांच्या मनाशी खेळताय तुम्ही.'' अरे काय चाललयं, करा आता सुरू असेही एका युजरने म्हटले.
महाराष्ट्रात पुन्हा घुमणार बिग बॉसचा आवाज
हिंदीमधल्या अफाट यशानंतर 'बिग बॉस' हा कार्यक्रम मराठीतही सुरु झाला. “बिग बॉस मराठी”चा आवाज संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरांत जाऊन पोहोचला. प्रेक्षक या कार्यक्रमावर बेहद फिदा झाले. “बिग बॉस मराठी” च्या पहिल्या चार सिझनने मराठी प्रेक्षकांची तुफान मने जिंकली आणि मराठमोळ्या थिमसह बिग बॉसच्या चारही सिझनची जोरदार चर्चा झाली. आता त्याच 'बिग बॅास' मराठीच्या नव्या सिझनची जोरात तयारी सुरू झालीय.