Bigg Boss Marathi : एक नंबर! अख्खा महाराष्ट्र याचीच वाट पाहत होता, आता सगळ्यांचा माज उतरणार; रितेश भाऊचा निक्कीला 'दे धक्का'
स्नेहल पावनाक | 03 Aug 2024 07:37 PM (IST)
Bigg Boss Marathi New Season : बिग बॉस मराठीमध्ये आज रितेश भाऊंच्या धक्क्यावर स्पर्धकांची वाट लागणार आहे. रितेश भाऊ निक्कीवर चांगलाच बरसल्याचं पाहायला मिळणार आहे.
Bigg Boss Marathi New Season
Bigg Boss Marathi New Season : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 5) नव्या सीझनचा आज पहिला वीकेंड. या सीझनमधील पहिल्याच वीकेंडचा रितेश भाऊंच्या (Riteish Deshmukh) धक्क्यावर स्पर्धकांची शाळा भरणार आहे. बिग बॉस मराठीमध्ये आज रितेश भाऊंच्या धक्क्यावर स्पर्धकांची वाट लागणार आहे. रितेशा भाऊंच्या धक्क्याचा पहिला प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये रितेश भाऊ निक्कीवर चांगलाच बरसल्याचं पाहायला मिळणार आहे. मराठी माणसाचा अपमान केल्याबद्दल रितेश निक्कीला महाराष्ट्राची माफी मागायला सांगताना दिसत आहे.
रितेश भाऊचा निक्कीला 'दे धक्का'
बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनला 29 जुलैपासून सुरुवात झाली आहे. या सीझनच्या पहिल्याच दिवसापासून घरामध्ये राडा पाहायला मिळत आहे. निक्की तांबोळी हीने पहिल्याच दिवसापासून इतर स्पर्धकांसोबत वाद घालायला सुरुवात केली. निक्कीने पहिल्याच दिवशी वर्षा उसगांवकर यांच्याशी भांडण केलं, त्यानंतर कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरसोबत वाद घातला. त्यानंतर निक्की रॅपर आर्या जाधवला जाऊन भिडली. यानंतर निक्की तांबोळीवर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे. आज रितेश भाऊंच्या धक्क्यावर निक्कीची वाट लागणार असं प्रोमोमधून दिसत आहे. यावर नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे.
"आता सगळ्यांचा माज उतरणार"
कलर्स मराठीने शेअर केलेल्या नवीन प्रोमोमध्ये रितेश भाऊ निक्कीची शाळा घेताना दिसत आहे. प्रोमोमध्ये रितेश देशमुख निक्कीला बोलतो की, "निक्की तुम्ही इथे मराठी माणसाची मेंटॅलिटी काढून मराठी माणसाचा अपमान केलाय." यानंतर निक्की बोलण्यासाठी हात वर करते, यावेळी रितेश म्हणतो, "हात खाली... आता मी बोलतोय. आताच्या आता माझ्या मराठी माणसाची तुम्हाला माफी मागायला हवी. या घरात ज्याला बोलायचं भान नाही, त्याला इथे स्थान नाही." रितेश भाऊंचा हा अवतार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचं दिसत आहे.
अख्खा महाराष्ट्र याचीच वाट पाहत होता...
बिग बॉस मराठीवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया
नेटकरी कमेंट करत रितेश भाऊंच्या धक्क्यावर प्रतिक्रिया देत आहे. एकाने कमेंट करत लिहिलंय, "अखेर... अख्खा महाराष्ट्र याचीच वाट पाहत होता 🙌". दुसऱ्याने कमेंट करत लिहिलंय, "एक नंबर... हेच बघायचं होतं अख्ख्या महाराष्ट्राला...👏" आणखी एकाने लिहिलंय, "आता सगळ्यांचा माज उतरणार...🔥". यासोबतच "भाऊ एक नंबर", "रितेश सरांनी सिद्ध केलं की, मराठी माणसांबद्दल वाईट बोललेलं सहन केलं जाणार नाही 🙌", "वाह रितेश भाऊ वाह... हेच अपेक्षित होतं 👏" अशा कमेंट्स पाहायला मिळत आहे. यामध्ये कोरिओग्राफर वैभवच्या कमेंटनेही लक्ष वेधलंय. वैभवने कमेंटमध्ये लिहिलंय, कडक... कडक... कडक... रितेश सर जय महाराष्ट्र... यासाठी खूप प्रेम... हा अहंकार घालवणे खूप गरजेचं आहे."