पुष्करने 15 जुलै रोजी आपला वाढदिवस साजरा केला, मात्र त्याच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये जास्मिन कुठेच न दिसल्यामुळे दोघांमध्ये सारं काही आलबेल नसल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या. विशेष म्हणजे 'बिग बॉस मराठी'मधील सहस्पर्धक सई लोकूरमुळे पुष्कर-जास्मिनच्या नात्यात वितुष्ट आल्याचं म्हटलं जात आहे.
जास्मिनने सोशल मीडियावरुन तिचे आणि पुष्करचे सगळे फोटो डिलीट केल्याचं दिसत आहे, त्यामुळे आगीत तेलच ओतलं गेलं. त्याचप्रमाणे दोघांनीही एकमेकांना अनफॉलो केल्यामुळे चर्चांना आणखी ऊत आलं आहे. पुष्कर आणि सई यांच्यात असलेल्या जवळीकीमुळे जास्मिनसोबत तो वेगळा झाल्याचा दावा काही जणांनी ट्वीटरवर केला आहे.
जास्मिनने फादर्स डेला इन्स्टाग्रामवर मुलगी फेलिशासोबत एक फोटो शेअर केला. 'जेव्हा तुम्ही पालक असता- तुम्हाला दोन्ही भूमिका कराव्या लागतात.' असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं. 'सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करणं गरजेचं आहे, असं मला वाटत नाही. मी वर्किंग वुमन आहे. त्यामुळे मी स्वतंत्र आणि खंबीर आहे. म्हणून मी #motherasfather हा हॅशटॅग कॅप्शनमध्ये वापरला' असं उत्तर जास्मिनने 'टाइम्स ऑफ इंडिया' या वृत्तपत्राला दिलं. 'आमच्या नात्याबद्दल पुष्करच नीट सांगू शकेल.' असंही ती म्हणाली.
'आमच्या नात्याविषयी भाष्य करणारे ट्वीट्स हे माझी प्रतिमा डागाळण्यासाठी आहेत. सोशल मीडियावर अशा गोष्टी लिहिण्यासाठी ट्रोलर्सना कोण पैसे पुरवतं कोणास ठाऊक. हे सगळं धादांत खोटं आहे' अशी प्रतिक्रिया पुष्करने 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिली आहे.
'माझी बायको, मुलगी आणि आईसोबत माझं नातं कसं आहे, याचं उत्तर कोणालाही देण्यास मी बांधील नाही. माझ्या वैयक्तिक आयुष्याचा मान राखा आणि माझ्या कुटुंबाला कशातही गोवू नका' असंही पुष्कर पुढे म्हणाला. 'माझ्या कुटुंबाला मीडियापासून दूर राहायचं आहे' असंही पुष्करने सांगितलं.
'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या पर्वात अंतिम फेरीत प्रवेश केलेल्यांपैकी विजेती मेघा धाडे, पुष्कर जोग आणि सई लोकूर यांच्या मैत्रीची जबरदस्त चर्चा होती. त्यातच सई आणि पुष्कर यांच्याविषयी सोशल मीडियावर अजूनही चर्चा रंगतात. सईड्या आणि पुष्की अशी टोपणनावं त्यांनी एकमेकांना दिल्यामुळे अनेकांच्या भुवया विस्फारल्या.