Bhushan Kadu Maharashtrachi Hasyajatra :  मराठी रंगभूमी, छोटा पडदा आणि रुपेरी पडद्यावर आपल्या विनोदी अभिनयाने छाप सोडणार अभिनेता भूषण कडू (Bhushan Kadu) मागील काही काळापासून मनोरंजन क्षेत्रापासून दूर आहे. कोरोना काळात ओढावलेल्या संकटानंतर भूषण काहीसा खचला होता. आता मात्र, त्याने पुन्हा एकदा उभारी घेण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत. 'कॉमेडी एक्स्प्रेस'मुळे भूषण हा घराघरात पोहचला होता. त्यानंतर  त्याने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये (Maharashtrachi Hasyajatra) धमाल उडवली होती. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या या अभिनेत्यावर मात्र नियतीने एकापाठोपाठ एक संकटांची मालिका सुरू केली. भूषणने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो का सोडला याचे कारण सांगितले आहे. 


कोरोना काळापासून मनोरंजनसृष्टीपासून काहीसा दूर गेलेल्या भूषण कडूने आपल्यावर बेतलेल्या संकटावर भाष्य केले. 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत भूषणने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'शो का सोडला याचे कारण सांगितले. 


'हास्यजत्रे'सेटवर धमकी देणारे यायचे...अनोळखी लोकांना भीती


भूषण कडूने सांगितले की विचारणा झाल्यावर मी आनंदाने हास्यजत्रा शो जॉईन केला. सगळं सुरळीत असताना मी आर्थिक कोंडीत अडकलो होतो. त्यावेळी एक-दोनजणांकडून आर्थिक मदत घेतली होती.  आता चांगली वाटणारी व्यक्ती  आपल्यासोबत नंतर क्रूर वागेल असे वाटत नव्हते. मला हास्यजत्रेतील कामाचे पैसे आले की लगेच त्यांचे हप्ते फेडायचो. पण, कालांतराने ज्यांच्याकडून हे पैसे घेतले होते त्या व्यक्तींकडून मला फोनवरून धमकीचे फोन येऊ लागले. इतकंच नाहीतर सेटवर येऊन धमकी द्यायचे. सेटवर अनोळखी व्यक्ती दिसली की भीती वाटायची ही व्यक्ती आपल्या धमकी द्यायला आलीय का असे वाटायचे, असे भूषणने सांगितले. 


भूषण कडूने पुढे सांगितले की, हास्यजत्रेत आम्हाला सगळे पैसे वेळेत मिळायचे. अनेकदा अॅडव्हान्सही दिला जायचा. पण, सचिन गोस्वामी यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे त्यांना होम क्वारंटाईन व्हावे लागले. आता सचिन सर सेटवर आले नाहीतर आता आमचे चेक कोण काढणार असा प्रश्न निर्माण झाला. त्या दरम्यान माझ्याकडून उधारीचे पैसे देण्यास उशीर झाला. त्यावेळी पैसे घेतलेल्या लोकांकडून धमकी येऊ लागली. यातून मी अस्थिर झालो. जेवणही जात नव्हतो. प्रचंड ताण निर्माण झाला होता. या दरम्यान मला रक्तदाबाचा त्रास सुरू झाला असल्याचे भूषणने सांगितले.


मित्राने रुग्णालयात अॅडमिट केले...


एकदा मला अचानक बरं वाटत नव्हते. अचानक चक्कर आली. मी मित्राला बोलावून घेतले.त्याने मला रुग्णालयात अॅडमिट केले. तिथे डॉक्टरांनी रक्तदाब वाढल्याने हा त्रास झाला असल्याचे सांगितले. वेळेत आणले नसते तर ब्रेन हॅमेरज झाला असता असेही भूषणने सांगितले. 


डॉक्टरांनी मित्राला मला कोणत्याही पद्धतीचा त्रास न देण्यास सांगितले. मित्राने मोबाईल फोन स्वीच ऑफ केला. रुग्णालयात डॉक्टरांनी लावलेल्या सलाईनमुळे मला झोप लागली. उठलो तेव्हा रात्रीचे 8.30 वाजले होते. 


इंडस्ट्रीत पाठ वळली की गॉसिप सुरू ...


भूषणने सांगितले की, फोन स्विच ऑफ असल्याने मला हास्यजत्रेच्या सेटवर मी कुठे आहे हे सांगता आले नाही. घरीदेखील काय सांगावे हे मला कळत नव्हते. इंडस्ट्रीत कलाकाराची पाठ वळली की गॉसिप सुरू होते. काही लोकांकडून कदाचित अनामिक लोकांकडून सरांच्या कानावर काही गोष्टी गेल्या. ड्रिंककरून पडला असेल, न सांगता दुसरं काम घेतलं असेल अशा अनेक वावड्या उठवण्यात आल्या. या प्रकाराने नाईलाजाने मला मनाविरुद्ध मला हास्यजत्रेतून एक्झिट घ्यावी लागली असल्याचे भूषण कडूने सांगितले. 


इतर संबंधित बातमी: