औरंगाबाद : औरंगाबादमधील खुलताबाद तालुक्यातल्या गोळेगावात पाणी फाऊंडेशनच्या कामाला सुरुवात झाली आहे. गोळेगावाची यंदाच्या वॉटर कप स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.


सकाळी 6 वाजल्यापासूनच गावकऱ्यांनी श्रमदान सुरु केलं. गावात छोटे बंधारे आणि चरांच्या माध्यमातून जलसंधारणाची कामं करुन पाणी अडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

भविष्यात दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येऊ नये, म्हणून वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून जलसंधारणाची कामं केली जात आहेत. त्याचाच भाग म्हणून आता गोळेगाव ग्रामस्थांनी देखील स्पर्धा जिंकण्यासाठी कंबर कसली आहे.

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात म्हणजे 'तुफान आलंया....!' मध्ये विदर्भ योद्धा, मराठवाडा वीर आणि पश्चिम महाराष्ट्राचे मावळे अशा तीन संघाचा समावेश असेल. या पर्वात महाराष्ट्राच्या 30 तालुक्यांमधून तब्बल 2024 गावं सहभागी होणार आहेत.

'वॉटर कप'चं पुन्हा 'तुफान आलंया...!'


8 एप्रिल 2017 ते 22 मे 2017 दरम्यान ही स्पर्धा रंगेल. एबीपी माझावर दर शनिवारी रात्री 9 वाजता हा कार्यक्रम पाहता येणार आहे.

वॉटर कप स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात सहभागी 30 तालुके

पुणे – पुरंदर, इंदापूर
वाशिम – कारंजा
सातारा – कोरेगाव, माण, खटाव
औरंगाबाद – फुलंब्री, खुलताबाद
उस्मानाबाद – भूम, परंडा, कळंब
लातूर – औसा, निलंगा
वर्धा – आर्वी
यवतमाळ – राळेगाव, कळंब, उमरखेड
अकोला – अकोट, पातुर, बार्शी-टाकळी
सांगली – खानापूर, आटपाडी, जत
सोलापूर – सांगोला, उत्तर सोलापूर
बीड – अंबेजोगाई, केज, धारुर
अमरावती – वरुड, धारणी

सत्यमेव जयते वॉटर कपच्या पहिल्या पर्वात 116 गावं सहभागी झाली होती. पानी फाऊंडेशनने महाराष्ट्रातल्या तीन तालुक्यात ही स्पर्धा घेतली होती.

पहिल्या वॉटर कप स्पर्धेचा निकाल


पहिला क्रमांक  : साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातल्या वेळू गाव ( 50 लाख रुपये)

दुसरा क्रमांक : साताऱ्याच्या जायगाव आणि बीडच्या खापरटोन गावांना विभागून (30 लाख रुपये)

तिसरा क्रमांक : बीडच्या राडीतांडा आणि अमरावतीच्या वाठोडा गावांना विभागून (20 लाख रुपये)