Apurva Nemlekar Entry In Premachi Gosta Serial : 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Gosta) ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) आणि राज हंचनाळे (Raj Hanchnale) मुख्य भूमिकेत आहेत. तर आता या मालिकेत अण्णांची शेवंता अर्थात अपूर्वा नेमळेकरची (Apurva Nemlekar) एन्ट्री होणार आहे.


'प्रेमाची गोष्ट' मालिकेत अपूर्वा नेमळेकरची एन्ट्री!


'प्रेमाची गोष्ट' या मालिकेचा नुकताच एक प्रोमो आऊट झाला आहे. या प्रोमोमध्ये अपूर्वा नेमळेकरचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेच्या प्रोमोजना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत असून नव्या पात्रांना भेटण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. सुप्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून एका लक्षवेधी भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येईल. सावनी असं तिच्या भूमिकेचं नाव असून अतिशय ग्लॅमरस असं हे पात्र आहे.






सावनीच्या भूमिकेबद्दल बोलताना अपूर्वा नेमळेकर म्हणाली,"प्रेमाची गोष्ट' या मालिकेत मी खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. खलनायिका जरी साकारत असले तरी या भूमिकेला अनेक कंगोरे आहेत. सावनी हे पात्र उभं करताना अभिनेत्री म्हणून माझा कस लागतोय. या भूमिकेसाठी मी गेल्या अनेक महिन्यांपासून तयारी करतेय. माझ्या लूकवर खूप मेहनत घेतली जातेय. मी या भूमिकेसाठी बरचसं वजनही कमी केलंय".


अपूर्वा पुढे म्हणाली,"सावनी अतिशय ग्लॅमरस आहे. त्यामुळे साड्यांपासून ते अगदी तिच्या दागिन्यांपर्यंत सगळं खूपच खास असणार आहे. मी आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा अतिशय वेगळी अशी ही भूमिका आहे. प्रेक्षकांनी मला माझ्या प्रत्येक कामात मोलाची साथ दिली आहे. हीच साथ आणि प्रेम माझ्या नव्या मालिकेलाही मिळेल याची खात्री आहे".


'प्रेमाची गोष्ट' मालिकेबद्दल जाणून घ्या...


'प्रेमाची गोष्ट' ही मालिका 4 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. प्रेमाची गोष्ट ही मालिका देखिल नात्यांची गुंफण असेल. चिमुकल्या सईवरच्या प्रेमापोटी दोन विभिन्न स्वभावाचे मुक्ता आणि सागर कसे एकत्र येतात आणि त्यांच्यातलं प्रेम कसं बहरत जातं हे सांगणारी सुंदर, तरल कथा म्हणजे 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका होय.


प्रेमाची गोष्ट या नव्या मालिकेत प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान मुक्ता गोखले ही भूमिका साकारणार असून राज हंचनाळे सागर कोळीच्या भूमिकेत दिसेल. यासोबतच शुभांगी गोखले, संजीवनी जाधव, अपूर्वा नेमळेकर, संजय शेजवळ, योगेश केळकर, उमेश घाडगे, सुप्रीत कदम आणि बाल कलाकार इरा पारवडे अशी दिग्गज कलाकारांची फौज मालिकेतून भेटीला येईल. राहुल लिंगायत या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत.


संबंधित बातम्या


Premachi Gosht : तेजश्री प्रधानच्या 'प्रेमाची गोष्ट' मालिकेचा प्रोमो आऊट; नेटकरी म्हणाले,"ये है मोहोब्बतें'चा रिमेक