Rupali Ganguly Controversy: अनुपमा (Anupamaa) फेम अभिनेत्री रुपाली गांगुली (Rupali Ganguly) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. रुपालीनं सावत्र मुलगी ईशा वर्माच्या (Isha Verma) विरोधात 50 कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. रुपालीची सावत्र मुलगी ईशानं तिच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. ज्यानंतर रुपालीनं अॅक्शन घेतली आहे. दरम्यान, रुपालीनं नोटीस धाडल्यानंतरही ईशानं त्यावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. पण, ईशानं मोठं पाऊल उचललं आहे. ईशानं आपलं इन्स्टाग्राम हॅन्डल प्रायव्हेट केलं आहे.
यापूर्वी ईशाचं इंस्टाग्राम अकाउंट पब्लिक होतं. पण, वाढत्या विवादामुळे तिनं तिचं अकाउंट प्रायव्हेट केलं आहे. यापूर्वी रुपाली गांगुलीसुद्धा तिला फॉलो करत होती. पण, आता चाहत्यांनी नोटीस केलंय की, रुपाली तिला फॉलो करत नाही. दरम्यान, ईशाच्या इन्स्टाग्रामवर 15 हजारांच्या आसपास फॉलोअर्स आहेत. ईशा सोशल मीडियावर फारच अॅक्टिव्ह असते. ती तिच्या पर्सनल लाईफबाबत अनेकदा सोशल मीडियावर जाहीरपणे वक्तव्य करत असते.
प्रकरण नेमकं काय?
ईशा वर्मानं काही वर्षांपूर्वी रुपालीवर अनेक गंभीर आरोप केले होते. यासंदर्भात तिनं इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केलं होतं. या पोस्टमध्ये ईशानं सांगितलं होतं की, रुपालीचं अश्विन वर्मासोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं. काही वेळापूर्वी ईशा वर्माची पोस्ट इन्स्टाग्रावर व्हायरल झाली होती. ईशानं पुन्हा याबाबत आणखी एक पोस्ट करत रुपाली गांगुलीवर गंभीर आरोप केले होते. ईशानं दावा केला होता की, रुपाली तिच्या वडिलांना टॉर्चर करायची.
ईशानं रुपालीवर आरोप केल्यामुळेच अनुपमा फेम अभिनेत्रीनं तिला मानहानीची नोटीस धाडली आहे. तसेच, ईशा वर्माच्या विरोधात 50 कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. तसेच, रुपाली गांगुलीची वकील सना रईसनं सांगितलं की, "आम्ही रुपालीत्या सावत्र मुलीला खोटं आणि नुकसान पोहोचवणारी वक्तव्य केल्याप्रकरणी मानहानीची नोटीस धाडली आहे. रुपालीनं पब्लिसिटीसाठी मानहानिकारक वक्तव्य केल्याप्रकरणी ठाम भूमिका घेतली आहे. तिनं आपल्या सुरक्षेसाठी कायदेशीर पावलं उचलली आहेत."
दरम्यान, या प्रकरणाची सुरुवात तेव्हा झाली, ज्यावेळी ईशा वर्मानं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन रुपाली गांगुलीवर गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली. ईशा वर्मानं आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं होतं की, माझ्या वडिलांचं पहिलं लग्न झालं असूनही रुपाली गांगुलीचं वडिलांसोबत अफेअर होतं. तर अलिकडेच तिनं आपल्या एका पोस्टमध्ये रुपाली गांगुलीच्या 11 वर्षाच्या मुलाचाही उल्लेख केला होता, त्यामुळे रूपाली गांगुलीचा संताप वाढला होता.