Krishna Mukherjee Accuses Shubh Shagun Producer:  सिने आणि टीव्ही इंडस्ट्रीतील ग्लॅमरस जगातील बऱ्या वाईट प्रसंगाची अनेकदा चर्चा होत असतात. मुलींसाठी हे क्षेत्र किती सुरक्षित आहे, याची चर्चादेखील होत असते. अभिनेत्रींनीदेखील अनेकदा त्यांच्यावर ओढावलेल्या प्रसंगावर भाष्य केले आहे.  आता या यादीत छोट्या पडद्यावरील आणखी एका अभिनेत्रीचे नाव जोडले गेले आहे. छोट्या पडद्यावरील अभिनेत्री कृष्णा मुखर्जीने (Krishna Mukherjee) आपल्यावर बेतलेला प्रसंग सोशल मीडियावर शेअर केला आहे. 


'ये है मोहब्बतें' या सर्वात लोकप्रिय डेली सोपमधून अभिनेत्री कृष्णा मुखर्जीला ओळख मिळाली. मनोरंजन क्षेत्रात तिने एक दशकांहून अधिक काळ काम केले असून  'नागिन 3', 'कुछ तो है: नागिन एक नए रंग में', 'शुभ शगुन' आदी मालिकांमध्ये काम केले. आता, कृष्णाने तिच्या या इंस्टाग्राम अकाऊंटवर 'शुभ शगुन'च्या सेटवर आलेला एक वेदनादायक अनुभव सांगितला.


कृष्णा मुखर्जीचा 'शुभ शगुन'च्या निर्मात्यावर आरोप 


अभिनेत्री कृष्णा मुखर्जीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली असून गेल्या दीड वर्षापासून आपण खूप काही सहन करत असल्याचे तिने म्हटले आहे. यापूर्वी या विषयावर बोलण्याची हिंमत नव्हती, पण आता आणखी काही सहन करायचे नाही, असा निर्धार करून तिने काही गोष्टी मांडल्या आहेत. तिने आपल्या पोस्टमध्ये निर्माता कुंदन सिंह यांना टॅग केले आहे. आपल्याला प्रोडक्शन हाऊस आणि निर्मात्याकडून वारंवार त्रास दिला जात असल्याचा आरोप तिने केला.


कृष्णाने आपल्या पोस्टमध्ये काय म्हटले?


कृष्णाने म्हटले की,  मनातील गोष्ट सांगण्याची माझी हिंमत होत नव्हती. आता मात्र मी आणखी गप्प बसणार नसल्याचे ठरवले आहे. मी खूप कठीण काळातून जात आहे. मागील दीड वर्षाचा काळ माझ्यासाठी खूपच कठीण काळ होता असे कृष्णाने म्हटले. मी उदास आहे, त्रासलेली आहे आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत आहे. मी एकटी होती तेव्हा मी मनाने तुटली होती. या सगळ्या गोष्टी मी दंगल टीव्हीसाठी 'शुभ शगुन' सारख्या मालिकेत काम करण्यास सुरुवात केली.  हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट निर्णय होता, असेही तिने म्हटले.  खरंतर ही मालिका करणार नव्हती. मात्र, इतरांच्या बोलण्यात अडकले आणि मालिकेत काम करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रोडक्शन हाऊस आणि निर्मात्यांनी मला खूपच त्रास दिला असल्याचे कृष्णा मुखर्जीने सांगितले. 






निर्मात्याने मेकअप रुम मध्ये...


कृष्णाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, निर्मात्याने तिला मेकअप रूममध्ये बंद केले होते. कृष्णाने लिहिले की, "त्यांनी मला एकदा माझ्या मेकअप रूममध्ये बंद केले होते.  मला बरे वाटत नव्हते आणि मी शूट न करण्याचा निर्णय घेतला. ते मला माझ्या कामाचे पैसेही देत नव्हते आणि मी अस्वस्थ होते.  माझ्या मेकअप रुमचा दरवाजा जोरजोरात वाजवत होते. असं वाटलं की ते आता दरवाजा तोडून देतील. त्यावेळी मी माझे कपडे बदलत होती. निर्मात्यांनी  मला 5 महिन्यांच्या कामाचे पैसे दिले नाहीत. ही रक्कम खूपच मोठी आहे.  मी दंगल चॅनेलच्या ऑफिसमध्ये ही गेले. मात्र, त्यांनी माझ्याकडे सपशेल दुर्लक्ष केले. 


अनेकदा धमकी मिळाली... 


कृष्णाने असेही सांगितले की, तिला अनेकदा धमक्या दिल्या गेल्या, त्यामुळे ती घाबरली. मी अनेक लोकांकडे
मदत मागितली, पण कोणीही मदत करू शकले नाही. त्याशिवाय, या अभिनेत्रीने असेही म्हटले की हेच कारण आहे की ती सध्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये काम करत नाही. आता मला न्याय हवा असेही तिने सांगितले. 


नैराश्येच्या गर्तेत कृष्णा


कृष्णाने कॅप्शनमध्ये आणखी एक नोट देखील लिहिली आहे ज्यात तिने सांगितले की, माझ्यावर बेतलेला प्रसंग सांगताना हात अजूनही थरथर कापत आहेत, परंतु लिहावे लागले. कृष्णाने पुढे लिहिले की, “आम्ही आमच्या भावना लपवतो आणि सोशल मीडियावर आमची चांगली बाजू दाखवतो. पण हे वास्तव आहे. माझे कुटुंबीय मला असे करू नका असे सांगत होते. पोस्ट करायचं कारण ते अजून घाबरतात या लोकांनी तुम्हाला दुखावलं तर? पण मी का घाबरू? हा माझा हक्क आहे आणि मला न्याय हवा आहे, असेही तिने सांगितले.