Punyashlok Ahilyabai  : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ (Punyashlok Ahilyabai) या भव्य ऐतिहासिक मालिकेने आपल्या सुजाणतेने समाजात शांतता, समृद्धी आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणार्‍या अहिल्याबाई होळकर या महान शासनकर्तीचे प्रेरणादायक चरित्र मांडून प्रेक्षकांना या कथेत खिळवून ठेवले आहे. ही मालिका राणी अहिल्याबाई होळकर यांचे भव्य दिव्य जीवन चरित्र उलगडून दाखवते. आपल्या काळाच्या खूप पुढे पाहणारी ही स्त्री होती, जिने हे सिद्ध करून दाखवले की, माणूस जन्माने नाही तर कर्तृत्वाने मोठा ठरत असतो. आपले सासरे मल्हारराव होळकर यांच्या भक्कम पाठिंब्याने त्यांनी समाजातील काही अनिष्ट रूढींना आव्हान दिले आणि आपल्या प्रजेच्या हितासाठी सकारात्मक योगदान दिले.


अहिल्याबाई होळकर हे असे नाव होते, ज्याने फक्त इतिहास घडवला नाही, तर अनेक भावी पिढ्यांना प्रेरणा देखील दिली. सध्या ही मालिका अहिल्याबाईंच्या जीवनातील एक वैभवशाली प्रकरण ‘मा से मातोश्री अध्याय’ उलगडून दाखवत आहे. अहिल्याबाईंची  (Punyashlok Ahilyabai) भूमिका करणारी अभिनेत्री एताशा संझगिरी (‎Aetashaa Sansgiri) मालिकेतील लीपनंतर आईच्या भूमिकेत दिसत आहे.


मला हवे होते ते सर्व काही या मालिकेत!


27 वर्षीय एतशा या मालिकेत, इतर अनेक जबाबदार्‍या सांभाळतानाच मालेराव आणि मुक्ता या दोन मुलांच्या प्रेमळ पण कडक आईची भूमिका करत आहे. अहिल्याबाई होळकरांच्या भूमिकेने एतशाला अमाप लोकप्रियता मिळाली आहे. आता ती आईच्या भूमिकेत शिरली आहे. आपला अनुभव सांगताना एताशा म्हणते, ‘मला हवे होते ते सर्व काही या मालिकेत आहे. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या वर्षात एक कलाकार अशा भूमिकांच्या शोधात असतो, ज्यातून त्याचे अभिनय कौशल्य अधिक उजळून निघेल. मला जेव्हा अहिल्याबाईंची भूमिका देऊ करण्यात आली, तेव्हा मी थोडी घाबरले होते. कारण ही भूमिका करताना खूप मोठी जबाबदारी घ्यावी लागणार होती. ‘आपल्या हातून काही चूक झाली तर?’ अशी भीती मला वाटायची, कारण अहिल्याबाई एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे, जिच्याकडे लोक आदराने पाहतात. अहिल्याबाईंनी एक मुलगी, पत्नी, सून, आई, राज्यकारभारकर्ती वगैरे अनेक भूमिका उत्कृष्टपणे निभावल्या आहेत. त्यामुळे अहिल्याबाई साकारणे हे मोठे आव्हान होते.’


अभिनेत्री म्हणून शिकण्यासारखे बरेच काही!


एतशा म्हणते, ‘पण मला ही भूमिका स्वीकारण्याची सद्बुद्धी झाली म्हणायचे, कारण प्रेक्षकांनी या व्यक्तिरेखेला खूप प्रेम दिले. मला त्यातून प्रेरणा मिळाली. आता मला मालिकेत दोन मुलांच्या आईची भूमिका करायची आहे, तर माझे कर्तव्य दुप्पट झाले आहे. मी त्यावर कसा विचार करते आणि या भूमिकेसाठी मनाची कशी तयारी करते यावर सगळे काही अवलंबून आहे. आईची भूमिका करताना मला अनेक वेगवेगळ्या गोष्टी अनुभवायला मिळत आहेत. त्यामुळे ही जबाबदारी पार पडताना मला मजा येत आहे, असेच म्हणावे लागेल. या सगळ्या प्रक्रियेत एक अभिनेत्री म्हणून शिकण्यासारखे बरेच काही आहे, कारण त्यात अनेक भावभावनांचा कल्लोळ आहे. अभिनयाच्या बाबतीत मला हेच आवडते की, आपल्याला नानाविध भूमिका करण्याची संधी मिळते ज्यातून आपल्यातील कौशल्य विकसित होत जाते. मालिकेतील हा टप्पा आव्हानात्मक आहे, पण अहिल्याबाईंच्या जीवनयात्रेतील हा अध्याय मला मनापासून आवडला आहे आणि मला आशा आहे की, प्रेक्षक आणि माझे चाहते मला असेच प्रोत्साहन देत राहतील.’


हेही वाचा :


Brahmastra : केसरिया गाणं ट्रोल झाल्यानंतर अयान मुखर्जीची प्रतिक्रिया; म्हणाला, 'आम्ही 48 तास विचार करत होतो'


Entertainment News Live Updates 16 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!