Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi 4) चौथ्या सीझनचा प्रोमो आऊट झाल्यापासून प्रेक्षक या कार्यक्रमाची प्रतीक्षा करत आहेत. येत्या दोन ऑक्टोबरपासून प्रेक्षकांना त्यांचा लाडका कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. पण आता बिग बॉसच्या घरात सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना आरटीपीसीआर टेस्ट करावी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.
'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या दोन पर्वात स्पर्धकांना घरात येणाऱ्या सेलिब्रिटींना आणि पाहुण्यांना थेट भेटता येत होतं. पण तिसऱ्या पर्वात कोरोना प्रादुर्भावामुळे स्पर्धकांना थेट सेलिब्रिटींना आणि पाहुण्यांना भेटता आलं नव्हतं. स्पर्धक आणि बाहेरुन येणाऱ्या सेलिब्रिटी आणि पाहुण्यांमध्ये एक पारदर्शक काच लावण्यात आली होती. आता कोरोना प्रादुर्भाव कमी झाला असला तरी पूर्णपणे तो आपल्यातून गेलेला नाही. त्यामुळे 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वातदेखील पारदर्शक काच असणार का? असा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे.
बिग बॉसच्या चाहत्यांना आता दोन ऑक्टोबरचे वेध लागले आहे. बिग बॉसच्या घरात कोणते स्पर्धक सहभागी होणार यावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. अमृता फडणवीस, नवनीत राणा तसेच हास्यजत्रेतील स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात सहभागी व्हावं अशी इच्छा चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
'बिग बॉस मराठी'चे तिन्ही पर्व लोकप्रिय ठरले आहेत. त्यामुळे आता चाहते चौथ्या पर्वाची प्रतीक्षा करत आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वात कोरोना प्रादुर्भावामुळे स्पर्धकांना अनेक अटी, नियम लागू करण्यात आले होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे स्पर्धकांना या पर्वात कोरोनाचे निर्बंध लागू असतील का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
संबंधित बातम्या