Shailesh Lodha : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे. या शोमधील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. जेठालालपासून ते तारक मेहतापर्यंत प्रत्येक व्यक्तिरेखा घरोघरी लोकप्रिय आहे. या शोमध्ये ‘तारक मेहता’ची भूमिका साकारणारे अभिनेता शैलेश लोढा (Shailesh Lodha) सध्या प्रचंड चर्चेत आहेत. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार शैलेशने या शोला अलविदा म्हटले आहे. दरम्यान, आता शैलेश लोढा यांच्या नवीन शोचा प्रोमो समोर आला आहे.


शैलेश यांनी शो सोडल्याचे ऐकल्यानंतर त्यांचे चाहते दु:खी झाले आहेत. मात्र, या चर्चेवर शोचे निर्माते आणि शैलेश लोढा यांचे अधिकृत वक्तव्य अद्याप आलेले नाही. त्यामुळे शैलेश ही मालिका सोडणार नाही, अशी अटकळ देखील बांधली जात आहे.


नव्या प्रोमोची चर्चा


‘तारक मेहता...’ सोडल्याची चर्चा सुरु असतानाच शैलेश लोढा यांच्या नव्या शोचा प्रोमो समोर आला आहे. शैलेश लोढा हा शो होस्ट करणार आहेत. ‘वाह भाई वाह’ असे या शोचे नाव आहे. या शोचा प्रोमो ‘शेमारू टीव्ही’ने सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रोमो शेअर करताना त्यांनी लिहिले, ‘वाह भाई! तुम्हाला माहिती असेलच, हा कोण आहे, जो नवीन शो घेऊन येत आहे?’



शैलेश यांचा चेहरा प्रोमोमध्ये दिसत आहे. यात ते म्हणतात, ‘तयार रहा, आम्ही लवकरच येतोय.’ या शोबद्दल अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही. मात्र, मीडिया रिपोर्टनुसार, शैलेशसोबत आणखी तीन कवी या शोमध्ये दिसणार आहेत. हा शो एखाद्या कवी संमेलनासारखा दाखवला जाणार आहे.


‘या’मुळे आले मालिका सोडण्याच्या चर्चेला उधाण!


गेल्या आठवडाभरापासून ‘तारक मेहता...’ या मालिकेमध्ये शैलेश लोढा दिसलेले नाहीत. तसेच, ते काही दिवसांपासून सेटवर देखील येत नसल्याचे अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता ते ही मालिका सोडणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. यावर आता निर्माते असित कुमार मोदी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.


एका प्रसिद्ध वेबसाईटशी बोलताना असित कुमार मोदी म्हणाले की, या सगळ्या अफवा आहेत. शैलेश लोढा किंवा मी यापैकी कुणीही याप्रकरणी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून येत असलेल्या बातम्या अस्वस्थ करणाऱ्या आहेत. शैलेश ही मालिका सोडणार आहे का, याबद्दल मला काहीच माहिती नाही. असे काही असते तर, मला नक्कीच आधीच कळवले गेले असते.


हेही वाचा :