Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. काही दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आशुतोषसोबत नव्याने आयुष्य सुरु करुन सुखाचे क्षण अनुभवत असतानाच पुन्हा एकदा नियती अरुंधतीची परिक्षा घेणार आहे. सगळं काही सुरळीत सुरु असतानाच अचानक एका अपघातात आशुतोषचं निधन होणार आहे. अरुंधतीसाठी हा सर्वात मोठा धक्का असणार आहे. मालिकेचा हा नवा प्रोमो आऊट झाल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोनंतर ट्रोलिंगची लाट पसरली असून सेटवर पत्रकार परिषद घेत कलाकारांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 


आई एकटी पडली तरी तिच्या पाठिशी एक आई उभी असते : अरुंधती


अरुंधती म्हणाली,"सून म्हणून देशमुखांच्या घरी आले आणि कधी इथली मुलगी होऊन गेले मला कळलंही नाही आणि त्याचं संपूर्ण श्रेय माझ्या सासूबाईंना जातं. मला आठवतात माझे सुरुवातीचे दिवस.. लहान होते, चुकत होते, अडखळत होते, धडपडत होते आणि या माझ्या आईने मला खूप काही शिकवलं. वेळप्रसंगी ओरडलीदेखील. पण सांभाळून घेतलं. हळूहळू आमच्यातलं सासू-सुनेचं नातं  कधी मिटत गेलं आणि आम्ही आई-मुलगी कधी झालो हे आम्हालाही कळलं नाही". 


अरुंधती पुढे म्हणाली,"एका टप्प्यावर माझ्या आयुष्यात खूप मोठी उलथापालथ झाली. त्यावेळीही माझी आई खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिली. जेव्हा माझ्या आयुष्यात एक माणूस आला तेव्हा स्वत: तिने माझं कन्यादान केलं. मोठ्या मनाची खंबीर आई. आज पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात एक मोठा आघात आला आहे. एकटी पडले आहे. ज्याच्यावर प्रेम केलं, ज्याचं प्रेम मला लाभलं तोच आता या आयुष्यात नाही. आई एकटी पडली तरी तिच्या पाठिशी एक आई उभी आहे. माझ्या या आईने मला पुन्हा एकदा जवळ घेतलं आहे. मुलाच्या विरोधात जाऊन ती माझ्या पाठीशी उभी आहे. एक आईच दुसऱ्या आईसाठी हे करू शकते".


'आई कुठे काय करते' का चालतेय? (Aai Kuthe Kay Karte Success Reason) 


एबीपी माझाशी बोलताना 'आई कुठे काय करते' या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणारी मधुराणी गोखले प्रभुलकर (Madhurani Gokhale Prabhulkar) म्हणाली,"मालिकेत आलेला ट्विस्ट आमच्यासाठीदेखील मोठा धक्का आहे. कधीकधी आयुष्यात अचानक काही घटना घडतात, तसंच हे झालं आहे. उत्तम कथा, उत्तम संवाद आणि उत्कृष्ट दिग्दर्शन यामुळे मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेत आता जे वळण आलं आहे ते फारसं कोणाला रुचणारं नाही. मालिका ट्रोल होण्याला आम्ही समजू शकतो".


अरुंधतीबद्दल बोलताना अनिरुद्धची आई म्हणाली,"नावाप्रमाणेच समृद्धी या वास्तुने देशमुखांना खूप काही दिलं आहे. आजवरचे अनेक चढ-उतार या वास्तुने आमच्यासोबत एकत्र पाहिले आहेत. कोणत्याही घराची ओळख त्या घराच्या आईमुळे होते. कारण वास्तू तथास्तू म्हणत असते. आई-वडिलांचे संस्कार. साधी ठेच लागली तरी आई गं हाच शब्द बाहेर पडतो. समृद्धी आणि अरुंधतीचं नातंदेखील तसंच आहे. अरुंधतीने या वास्तुला घरपण दिलं आहे. तिने घराचं गोकुळ केलं आहे. 


यश म्हणाला,"तुमच्या आमच्या घरातलं सामान्य असूनही असामान्य राहिलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे आई. अरुंधतीने तिच्या या जगण्यात संपूर्ण महाराष्ट्राला सामावून घेतलं आहे. त्यामुळेच आई कुठे काय करते आणि अरुंधतीचा प्रवास आज इथपर्यंत येऊन पोहोचला आहे". 


संबंधित बातम्या


Milind Gawali Post : 'मला माहितीये मी त्याला खूप खूप मिस करणार' ; अनिरुद्धची आशुतोषसाठी खास पोस्ट