Milind Gawali: अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) हे सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असतात. नुकतीच मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मिलिंद गवळी यांनी आई रेणुका लय भारी या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं. मिलिंद यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
मिलिंद गवळी यांनी आई रेणुका लय भारी या चित्रपटामधील सीन्सचा व्हिडीओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, “आई रेणुका लय भारी; या चित्रपटाचा शूटिंग कोल्हापुरात झालं, काही भाग रेणुका आईच्या यल्लम्मा मंदिरात , सौंदत्ती कर्नाटका मध्ये झाला आणि या चित्रपटाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे अलकाताई कुबल यांनी या चित्रपटांमध्ये विलनची भूमिका केलेली आहे, अलकाताई विलन म्हणजे त्यांच्या सोशिक प्रतिमेच्या अगदी विपरीत अशी भूमिका. हा चित्रपट आज शेमारू वर संध्याकाळी सहा वाजता वर्ल्ड प्रीमियर होणार आहे, असं आमच्या प्रोड्युसराने म्हणजेच सांगलीचे अण्णासाहेब उपाध्ये यांनी मला सांगितलं, इतक्या वर्षानंतर हा चित्रपट लोकांसमोर आता येणार आहे म्हणून मला खूप छान वाटलं.
मी स्वतःला खरंच भाग्यवान समजतो कारण चित्रपटात काम करण्याच्यानिमित्ताने मला या अशा पवित्र स्थळावर जायची संधी मिळाली आणि आई रेणुका यल्लमा देवीचे दर्शन छान पद्धतीने घेता येईल, माझी आई गेल्यानंतर ज्या ज्या वेळेला मी अशा ठिकाणी गेलोय तिथे मला माझ्या आईचा नेहमी भास होतो, शूटिंगच्या दिवशी मी मेकअप करून मंदिरात पोचलो, रेणूका आईचं दर्शन घेतलं आणि शॉर्ट साठी वाट बघत होतो, मला आमचे डिरेक्टर म्हणाले “तुम्ही गाडीत बसा आमची तयारी झाली की तुम्हाला बोलवतो”, गाडीत बसून मनात विचार चालले होते की आज माझी आई असती आणि तिला कळलं असतं की मी रेणुका मंदिरात शूटिंग करतो आहे तर तिला खूप आनंद झाला असता, आणि काही क्षणातच एक गरीब म्हातारी बाई डोक्यावर एक टोपली घेऊन माझ्या समोर आली, ती कान्नडी भाषेमध्ये काहीतरी बोलायला लागली, ती काय बोलतेय हे मला काही कळलं नाही, मी पैसे काढून तिला द्यायला लागलो तर ती नाही पैसे नको आहेत असं म्हणाली, तिने टोपलीतून दोन भाकऱ्या काढल्या , त्याच्याबरोबर पिठलं आणि मेथीची भाजी त्या भाकऱ्यांवर ठेवली आणि त्या भाकऱ्या तिने मला दिल्या , मला म्हणाली “ईद्धनु तिन्नू”. ड्रायव्हर कानडी होता तो मला म्हणाला 'आजी म्हणतात खाऊन घे' मी पैसे द्यायला लागलो तर आजी नको म्हणाली आणि भाकऱ्या देऊन निघून गेली. मी त्या मंदिराच्या परिसरात बसून त्या दोन्ही भाकऱ्या मनापासून खाल्ल्या. अनेक वर्ष हे स्मरणात राहिलेलं, आज संध्याकाळी सहा वाजता हा सिनेमा जेंव्हा लोकांसमोर येत आहे असं मला जेव्हा कळलं, तेव्हा पटकन हि गोष्ट डोळ्यासमोरून गेली आणि ती वयस्कर बाई जिने मला भाकरी दिली ती पटकन डोळ्यासमोर येऊन गेली. खरंच काही गोष्टी आपल्या अकलनाच्या पलीकडच्या,आपल्या बुद्धीच्या पलीकडच्या गोष्टी असतात, इतक्या वर्षानंतर “आई कुठे काय करते” चं यश आणि आजच्या दिवशी “आई रेणुका” च्या सिनेमा चं एका चॅनेलवर वर्ल्ड प्रीमियर. या दोघांमध्ये सामान्य घटक काय असेल तर ते आहे “आई” !'
मिलिंद गवळी यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात. मिलिंद गवळी यांनी पालखी, आधार आणि वैभव लक्ष्मी या चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या ते आई कुठे काय करते या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: