Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सध्या एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. जीवघेण्या अपघातानंतर आता आशुतोष बरा झाला आहे. त्याने पुन्हा एकदा आपल्या म्युझिक स्कूलचं काम सुरु केलं आहे. नितीन, अरुंधती आणि आशुतोष मिळून या कंपनीचे काम संभाळत आहेत. नव्या कामासाठी आता लोकांची जुळवाजुळव करण्याचं काम त्यांनी सुरु केलं आहे. मात्र, या दरम्यान आता अरुंधती आणि आशुतोष यांचं कडाक्याचं भांडण झालं आहे.


अरुंधतीला आशुतोषने कामात पार्टनर केल्याने अनेक लोक अरुंधतीला टोमणे देत आहेत. केवळ ती आशुतोषची मैत्रीण असल्याने तिला ही नोकरी मिळाली, असं म्हणत तिला हिणवत आहेत. यातच आता अविनाशला देखील आशुतोषने काम दिल्यामुळे अरुंधती त्याच्यावर चिडली आहे.


नेमकं का झालं भांडण?


आशुतोषने त्याच्या कंपनीत अरुंधतीशिवाय यश, शेखर, राधिका यांना देखील सामील करून घेतले होते. यावरून सतत अरुंधतीला बोलणी ऐकावी लागली होती. मात्र, आता आशुतोषने अनिरुद्धचा भाऊ अविनाश याला देखील कंपनीत नोकरी देऊ केली आहे. अविनाशला नोकरी मिळू नये, अशी अरुंधतीची इच्छा नाही. मात्र, पुन्हा एकदा यावरून तिला लोकांची बोलणी ऐकावी लागणार याचा राग आला आहे. यामुळेच चिडलेली अरुंधती आशुतोषशी बोलत असताना शब्दाने शब्द वाढतो आणि त्यांचा वाद होतो.


अरुंधती आशुतोषला म्हणते, ‘तुम्ही अविनाश भावजींना या कंपनीत नोकरी का दिलीत? आधीच मी तुमची मैत्रीण असल्याने तुम्ही मला काम दिलं यावरून बोलणी ऐकावी लागत आहेत.. आता यावरूनही ऐकावी लागतील...’ यावर आशुतोष म्हणतो, ‘लोक काय म्हणतील याचा विचार आपण करायचा नाही.. आणि असा विचार करायचा असेल, तर एकत्र कामच नको करायला.’ यावर अरुंधती म्हणते, यापुढे एकत्र काम करायचं नाही आणि तिथून निघून जाते. मात्र, बाहेर पडताच तिला आपल्या चुकीची जाणीव होते. आता अरुंधती आशुतोषची कंपनी सोडणार की, पुन्हा त्याची माफी मागून हे वाद मिटवणार, हे लवकरच पाहायला मिळणार आहे.  



हेही वाचा :