नवी दिल्ली : तांडव वेबसीरीजमध्ये एका दृश्यावरुन हिंदू देव-देवतांचा अपमान झाल्याचे आरोप सुरु झाले आणि त्यानंतर या सीरीजच्या निर्मात्यांनी विनाअट माफीनामा जाहीर केला आहे. या घटनेवरुन बरंच राजकारणही सुरु आहे. त्यामुळे सेन्सॉरशिप कल्चरचा शिरकाव आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही होऊ लागलाय की अशीही भीती निर्माण झाली आहे.


तांडव...या वेबसीरीजच्या नावाला साजेल असाच धुमाकूळ या सीरीजवरुन सुरु आहे. 9 एपिसोडच्या या सीरीजमध्ये चाळीस सेकंदांच्या एका सीनवरुन हिंदू-देव देवतांचा अपमान झाल्याचा आक्षेप सुरु झाला आणि नंतर हे प्रकरण माफीपर्यंत पोहोचलं. उत्तर प्रदेशात तर या सीरीजच्या निर्मात्यांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला. या सीरीजवर आक्षेप घेणाऱ्यांमध्ये भाजपचेच लोकप्रतिनिधी ठिकठिकाणी दिसत होते. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं या आक्षेपांची दखल घेत ओटीटी प्लॅटफॉर्मला नोटीस बजावली आणि त्यांनी हे माफीपत्र जाहीर केलं.


सीरीजमधल्या आक्षेपार्ह कंटेटबाबत आम्ही विनाअट माफी जाहीर करत आहोत. कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नव्हता. कुठल्याही धर्माला, राजकीय पक्षाला लक्ष्य करण्याच्या उद्देशानं हे संवाद लिहिले गेले नव्हते. तांडवचे निर्माते हिमांशू मेहरा आणि दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी हा माफीनामा जाहीर केला आहे. लखनौमध्ये जी एफआयआर दाखल करण्यात आली, त्यात या दोघांचीही नावं होती.


चित्रपट किंवा कलाकृतींवरुन होणारी निदर्शनं हा काही आपल्या देशात नवा प्रकार नाही. पण गेल्या काही वर्षात हे प्रमाण वाढतच चाललं आहे.अगदी गेल्या काही महिन्यातली उदाहरणं द्यायची तर आश्रम, अ सुटेबल बॉय आणि आता तांडव...प्रत्येक सीरीजमधल्या प्रसंगावर आक्षेप घेतलेले आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म मुळात कलाकाराला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्यासाठीच निर्माण झालेले आहेत. पण आता त्यातही सेन्सॉरशिप येणार का हा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतो.


अली अब्बास जफर हा तांडवचा दिग्दर्शक आहे. सैफ अली खान, डिंपल कपाडिया, सुनील ग्रोव्हर यांच्या या सीरीजमध्ये प्रमुख भूमिका आहेत. राजकारणावर आधारित या सीरीजमध्ये एका कॉलेजच्या गँदरिंगमध्ये नाटकात देवदेवतांच्या संवादाचं दृश्य आहे. सध्याचा वाद त्यावरुनच सुरु आहे.


ऑनलाईन कंटेटवर नियंत्रण हे सरकारला हवंच आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वी नियमांत बदलही करण्यात आले आहेत. त्यात अशा घटनांमुळे सेन्सॉरशिप कल्चर डिजीटलमध्येही शिरकाव करण्याची शक्यता आहे.


संबंधित बातम्या :