मुंबई: निर्माता अली अब्बास जफर याची 'तांडव' ही वेब सीरिज 15 जानेवारीला प्रदर्शित झाली. आपल्या प्रदर्शनासोबतच ही वेब सीरिज वादात सापडल्याचं पहायला मिळतंय. या वेब सीरिजमधील शंकर आणि राम या हिंदू देवतांवर आधारित एक दृश्य आहे. त्यावरुन सोशल मीडियात वाद निर्माण झाल्याचं पहायला मिळतंय. भाजप नेत्यांनीही या वेब सीरिजवर आक्षेप घेतला आहे.


भाजप नेते राम कदम यांनीही या वेब सीरिजला विरोध दर्शवत निर्माता आणि दिग्दर्शकांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "तांडव वेब सीरीज मध्ये झालेल्या हिंदू देव देवतांच्या विटंबनेच्या संदर्भात हिंदूच्या दुखावलेल्या भावनेविरोधात मी या वेब सिरीजचे निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता यांच्या विरोधात FRI दाखल करण्यासाठी घाटकोपर चिरागनगर पोलीस ठाणे येथे 12. 30 वाजता जाणार आहे."





आश्रम वेबसिरीजमध्ये बॉबी देओलसोबत बोल्ड सीन दिल्यानंतर अभिनेत्रीचा खुलासा, 'त्या' सीनचे शूटिंग कसे केले?


भाजप नेता कपिल मिश्रा यांनी या वेब सीरिजला विरोध करताना एक ट्वीट केलंय. त्यात त्यांनी म्हटलंय की, "तांडव वेब सीरिज ही दलित विरोधी आहे. ती हिंदूंच्या भावनाही भडकवणारी आहे. या विरोधात माहिती आणि प्रसारण मंत्री जावडेकरांना लोकांनी लिहावं." हे सांगताना कपिल मिश्रा यांनी मंत्रालयाचा ईमेल आयडीही दिला आहे.





कोणत्या दृष्यांना विरोध होतोय?


'तांडव' वेब सीरिजच्या पहिल्या एपिसोडमध्ये एका विद्यापीठाच्या नाटकामध्ये भगवान शंकराच्या भूमिकेत असलेल्या जीशान अयूबला नारदाच्या भूमिकेतील व्यक्ती म्हणते की, "भगवान, काहीतरी करा. सोशल मीडियावर भगवान रामाच्या फॉलोअर्समध्ये वाढ होत आहे. मला वाटतंय की, आपण काहीतरी वेगळी रणनीती तयार करायला हवी." त्यावर जीशान अयूब म्हणतो, "मग काय करु, बदलू का?" त्यावर नारद पुन्हा म्हणतो, "भगवान तुम्ही खूपच भोळे आहात."


Web Series 2021: यंदाच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार धमाकेदार वेब सीरिजचा नजराणा


या दृष्याला अनेक प्रेक्षकांनी आक्षेप घेतला आहे. तसेच आणखी एका दृष्यालाही प्रेक्षकांनी विरोध दर्शवला असून त्या दृष्याच्या माध्यमातून दलित विरोधी विचार दाखवल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. या प्रकरणावर सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर कमेन्ट करण्यात येत असून या सीरिजच्या माध्यमातून हिंदूंच्या भावना दुखावल्याचं मत व्यक्त करण्यात येत आहे. ट्विटरवर #BanTandavNow हा हॅशटॅगही ट्रेन्ड होतोय.


काही लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या वेब सीरिज विरोधात मत व्यक्त करताना त्यातून डाव्या विचारसरणीला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचाही आरोप केला आहे. तसेच अनेकांनी हा हिंदू विरोधी प्रचार असल्याचं मतही व्यक्त केलं आहे.


पॉलिटिकल ड्रामावर आधारित 'तांडव' या वेब सीरिजमध्ये सैफ अली खान, डिंपल कपाडिया, गौहर खान, जीशान अयूब , सुनिल ग्रोव्हर यांनी भूमिका केल्या आहेत. नऊ एपिसोड असणाऱ्या या वेब सीरिजमधून दिल्लीच्या आणि विद्यापीठाच्या राजकारणावर भाष्य करण्यात आलं आहे.


'The Family Man' च्या दुसऱ्या सीजनची पहिली झलक, मनोज वाजपेयी म्हणाला...