Takatak 2 : 'टकाटक 2' हा चित्रपट सध्या खूपच लाइमलाईटमध्ये आला आहे. मोशन पोस्टर, टिझर आणि टायटल साँग आल्यानंतर सर्वत्रच 'टकाटक 2' चीच चर्चा आहे. याच वातावरणात 'टकाटक २'मधील दुसरं गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे. तरुणाईसोबतच सर्वच वयोगटातील रसिकांना भावणारं आणि चित्रपटाच्या कथेशी एकरूप होणारं असं हे गाणं सोशल मीडियावर अफलातून गाजत आहे. लाँच होताच या गाण्यानं तूफान हिट्स मिळवत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.


'टकाटक 2'च्या टायटल साँगनंतर 'लगीन घाई...' हे आणखी एक धमाल साँग रसिकांच्या भेटीला आलं आहे. लेखक-दिग्दर्शक मिलिंद कवडे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'टकाटक २'मधील हे गाणं कथानकात महत्त्वाची भूमिका बजावणारं आहे. गीतकार जय अत्रे यांनी कथा आणि चित्रपटाचा जॅानर ओळखून 'लगीन घाई...' हे गाणं लिहिलं आहे. आनंद शिंदे आणि कविता राम यांनी हे गाणं गायलं असून, संगीतकार वरुण लिखते यांनी संगीतबद्ध केलं आहे. या गाण्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा मिलिंद कवडे, जय अत्रे, आनंद शिंदे आणि वरुण लिखते या चौकडीच्या संगीताची केमिस्ट्री अनुभवायला मिळणार आहे. यापूर्वी या चौकडीनं केलेली गाणी रसिकांनी डोक्यावर घेतली आहेत. त्यामुळं 'लगीन घाई...' हे गाणंही प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल याची 'टकाटक 2'च्या टिमला खात्री आहे. या गाण्याबाबत आनंद शिंदे म्हणाले की, मिलिंद कवडे यांनी रसिकांची नाडी ओळखली आहे. त्यांना काय हवं ते त्यांना चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळं त्यांच्या चित्रपटातील गाणी रसिकांच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी होतात. 'लगीन घाई...' हे गाणं माझ्या शैलीतील असून ते माझ्या नेहमीच्या अंदाजात गायलं आहे. गाणं रेकॉर्ड करताना खूप मजा आली. जय अत्रे यांनी लिहिलेल्या शब्दांना वरुण लिखते यांनी सुमधूर संगीताच्या माध्यमातून अचूक न्याय देण्याचं काम केलं आहे. हे गाण सर्व प्रकारचं संगीत ऐकणाऱ्या रसिकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होईल अशी आशाही शिंदे यांनी व्यक्त केली.


पाहा गाणं:



या चित्रपटात प्रथमेश परब, अजिंक्य राऊत, अक्षय केळकर, प्रणाली भालेराव, भूमिका कदम, कोमल बोडखे, सुशांत दिवेकर, स्वप्नील राजशेखर, किरण माने, पंकज विष्णू, किरण बेरड, आरजे महेश काळे, स्मिता डोंगरे आदी कलाकार झळकणार आहेत. दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी 'टकाटक 2'ची कथा-पटकथा लिहिली आहे. लेखक किरण बेरड आणि संजय नवगिरे यांनी संवादलेखनाचं काम केलं आहे. डिओपी हजरत शेख वली यांनी केलेली सिनेमॅटोग्राफी नजर खिळवून ठेवणारी असून, अभिनय जगताप यांनी दिलेलं पार्श्वसंगीत प्रसंगांमधील प्रभाव वाढवणारं आहे. निलेश गुंडाळे यांनी या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.


'टकाटक 2' निर्मिती रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओने, पर्पल बुल एंटरटेनमेंटच्या सहयोगाने केली असून ओमप्रकाश भट्ट, रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओ, नरेश चौधरी, आदित्य जोशी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. मिलिंद कवडे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. 18 ऑगस्ट रोजी 'टकाटक 2' संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा: