Takatak 2 : काही सिनेमे केवळ बॉक्स ऑफिसवर छाप सोडण्यासोबतच रसिकांच्या मनावरही आपला ठसा उमटवण्यात यशस्वी होतात. अशांपैकीच एक आहे 'टकाटक'. पहिल्या सिनेमाला रसिकांचा तूफान प्रतिसाद लाभल्यानं 'टकाटक 2'च्या (Takatak 2) रूपात या सिनेमाचा पुढील भाग 18 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मोशन पोस्टरनंतर आता 'टकाटक 2'चा टीझरही लाँच करण्यात आला आहे.
'टकाटक 2'चं लेखन-दिग्दर्शन मिलिंद कवडे यांनी केलं आहे. अॅडल्ट कॉमेडीच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत एक महत्त्वपूर्ण संदेश पोहोचवण्याचा नवा ट्रेंड त्यांनी 'टकाटक'च्या माध्यमातून सुरू केला आहे. 'टकाटक 2'मध्ये याचा पुढील टप्पा पहायला मिळणार आहे. आपला हात जगन्नाथ करत इथवर पोहोचलेला ठोक्या आता त्याची हातगाडी पुढे ढकलण्याच्या विचारात असल्याचं 'टकाटक 2'च्या टीझरमध्ये पहायला मिळतं. 'अव्हर ठोक्या इज बॅक' असं म्हणत 'टकाटक 2'मध्ये ठोक्या आपला पुढचा अध्याय लिहिताना दिसणार असल्याचे संकेत टीझर देतो.
मागच्या वेळेप्रमाणे या वेळीही त्याच्या जोडीला त्याचे फ्रेंडस प्रणाली भालेराव, अजिंक्य राऊत, अक्षय केळकर, भूमिका कदम, कोमल बोडखे, सुशांत दिवेकर असतील. या सिनेमात स्वप्नील राजशेखर, किरण माने, पंकज विष्णू, किरण बेरड, आरजे महेश काळे, स्मिता डोंगरे आदी कलाकारही वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
'टकाटक 2'ची मूळ संकल्पना मिलिंद कवडे यांचीच असून कथा-पटकथाही त्यांनीच लिहिली आहे. संवादलेखक किरण बेरड आणि संजय नवगिरे यांनी खुमासदार शैलीत संवादलेखन केलं आहे. जय अत्रेनं लिहिलेल्या गीतांना संगीतकार वरूण लिखतेनं संगीतसाज चढवला आहे. डिओपी हजरत शेख वली यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून पार्श्वसंगीत देण्याचं काम अभिनय जगताप यांनी केलं आहे. या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते निलेश गुंडाळे आहेत.
'टकाटक 2' या सिनेमाची निर्मिती रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओने, पर्पल बुल एंटरटेनमेंटच्या सहयोगाने केली असून ओमप्रकाश भट्ट, रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओ, नरेश चौधरी, आदित्य जोशी हे या सिनेमाचे निर्माते आहेत. मिलिंद कवडे हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. 18 ऑगस्ट 2022 रोजी हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या