Suyash Tilak : लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha Election 2024) महाराष्ट्रात चौथ्या टप्पातील 11 जिल्ह्यांत मतदानाचा हक्क अनेकांनी बजावला. यामध्ये शिरुर, पुणे यांसह अनेक मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे. अगदी सामान्यांपासून ते अनेक कलाकार मंडळींनी देखील त्यांचा मतदानाचा हक्क बजवला आहे. पण काही कलाकार मंडळींना काही तांत्रिक कारणांमुळे मतदानाचा हक्क बजावता आला नाहीये. आधी गायिका सावनी रविंद्र आणि आता अभिनेता सुयश टिळक (Suyash Tilak) याने देखील याविषयी नाराजी व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे.
सुयशने त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन एक पोस्ट करत याविषयी भाष्य केलं आहे. त्याचप्रमाणे या पोस्टला त्याने दिलेल्या कॅप्शनने देखील तीव्र नाराजी व्यक्त केल्याचं दिसत आहे. सुयशने म्हटलं की, 'दुर्दैवाने माझा मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला, कारण मतदार यादीतूनच माझं नाव यावर्षी गायब होतं.'
सुयशची पोस्ट काय?
सुयशने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने म्हटलं की, 'गेल्यावेळी मतदान केलं तेव्हा नावात चूक होती. त्यावेळी ती चूक सुधारायचा अर्ज दिला होता. यावेळी सुदैवाने ऑनलाईन पोर्टलवर खूप शोधल्यावर शेवटी नाव सापडलं असताना त्याच पुन्हा तीच चूक होती. वोटिंग बूथला सकाळी ७ वाजता पोहोचलो. माझ्या ऑनलाईन पोर्टलवरच्या यादीतील नाव नोंदीपेक्षा त्याजागी बूथवर असलेल्या यादीत मात्र वेगळंच नाव आढळलं. म्हणून ३ तास वेगवेगळ्या बूथवर जाऊन नाव शोधायचा प्रयत्न केला. अचानक यावेळी काही जणांचा मतदार संघच बदलला आहे ते समजलं, म्हणून वेगळ्या मतदार संघात पण चौकशी केली शोधाशोध केली.'
सुयशने व्यक्त केली खंत
सुयशने यंदाच्या वर्षात मतदान करता आलं नाही, याविषयी खंत देखील व्यक्त केली आहे. यावर बोलताना त्याने म्हटलं की, 'गेली अनेक वर्ष मी मतदान न चुकता करत आलो आहे, यावेळी मला तो हक्क बजावता आला नाही. कोणत्याही इतर पर्यायाने देखील मतदान करू दिले नाही या खंत वाटते आणि वाटत राहील.'