Suspense Thriller Movie: आधी मूव्ही पाहण्यासाठी थिएटरमध्ये जावं लागायचं किंवा तो टेलिव्हीजनच्या चॅनलवर कधी दाखवला जातोय, याची वाट पाहावी लागायची. पण, ओटीटी आलं आणि संपूर्ण चित्र पालटलं. आता तुम्हाला वाटेल तेव्हा, कधीही, कुठेही ओटीटीवर चित्रपट पाहू शकता. तुम्हीही ओटीटीवर सर्रास चित्रपट पाहात असाल आणि आता नव्या चित्रपटाच्या शोधात असाल, तर आज आम्ही तुम्हाला एका दमदार चित्रपटाबाबत सांगणार आहोत. हा एक सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट आहे. जो तुम्हाला अजय देवगण स्टारर दृश्यम विसरायलाही भाग पाडेल. 


बॉलिवूडमध्ये सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट क्वचितच पाहायला मिळतात. पण, जर तुम्हाला बदला आणि दृश्यमसारखे चित्रपट आवडले असतील, तर आज आम्ही तुम्हाला ज्या चित्रपटाबाबत सांगणार आहोत. तो चित्रपट पाहिल्यानंतर तुमच्या तोंडून शब्दच फुटणार नाही. या चित्रपटाचं कथानक तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतं. 


आम्ही तुम्हाला ज्या सस्पेन्स थ्रिलर बॉलिवूडपटाचं नाव सांगत आहोत, त्याचं नाव आहे, 'रहस्य' (Rahasya Movie). ही एक मर्डर मिस्ट्री आहे. ज्यामध्ये दिग्दर्शकानं थ्रिलर आणि सस्पेन्स अगदी भरभरून दिला आहे. चित्रपट सुरू झाल्यानंतर अवघ्या तीन मिनिटांत कहाणीमध्ये मोठा ट्वीस्ट येतो आणि तुम्ही थक्क होता. तिथूनच प्रेक्षकांच्या मनाच हत्या कुणी केली? का केली? गुन्हेगार कोण? यांसारखे प्रश्न काहूर माजवतात. सुरुवातीला असं दिसतं की, हे खूनाचं प्रकरण ओपन अँड  शट केस आहे. पण, तसं नसतं. 


चित्रपटाचं कथानक... 


'रहस्य' चित्रपटाची कथा जसजशी पुढे सरकते, तसतसा त्यात ट्विस्ट येतो. चित्रपटाची कथा घरातील मोलकरणीपासून सुरू होते. ती 30 वर्षांपासून डॉ. महाजन यांच्या घरी काम करत आहे. पण अचानक एके दिवशी डॉक्टरच्या 18 वर्षाच्या तरुण मुलीचा मृत्यू होतो आणि हा खून कोणी केला? असा प्रश्न सर्वांना पडतो. सुरुवातीला संशय नोकरांवर जातो. मग दुसरा संशय हाऊस हेल्परवर जातो. पण, शेवट काहीतरी वेगळाच... ही कथा आहे, या हत्येच्या रहस्यावर आधारित आहे. पण खुनी दीड शहाणा निघाला.


'रहस्य' हा 1 तास 57 मिनिटांचा चित्रपट आहे, जो 30 जानेवारी 2015 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात केके मेनन, आशिष विद्यार्थी, टिस्का चोप्रा, मीता वशिष्ठ आणि अश्वनी केळसकर असे कलाकार आहेत. नोएडाच्या आरुषी तलवारच्या 2008 च्या केसवरून हा सिनेमा प्रेरित असल्याचं म्हटलं जात आहे. 


उत्तम कथानक असूनही बॉक्स ऑफिसवर फ्लॉप 


'रहस्य' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. त्याचं बजेट सुमारे 6 कोटी रुपये होतं, तर त्यानं केवळ 2.8 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. त्याचं दिग्दर्शन मनीष गुप्ता यांनी केलं होतं. तुम्हाला हा चित्रपट पाहायचा असेल तर तुम्ही तो यूट्यूब आणि ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर पाहू शकता.