Janhavi Killekar On Suraj Chavan Wedding: 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi) पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणचा (Suraj Chavan) शाही विवाहसोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यासाठी त्याच्या चाहत्यांनी खूप मोठी गर्दी केलेली. सूरज चव्हाणनं आपल्या मामाच्या मुलीसोबत लग्नगाठ बांधली. दणक्यात सूरज चव्हाणचा (Suraj Chavan Wedding) विवाहसोहळा पार पडला. या सोहळ्याला त्याच्यासोबत 'बिग बॉस मराठी'च्या घरात असलेली त्याची सहस्पर्धक जान्हवी किल्लेकर (Janhavi Killekar) उपस्थित होती. सूरजच्या लग्नाच्या सर्व विधींना जान्हवी अगदी सावलीसारखी त्याच्यासोबत होती. पण, सूरजचं लग्न आटोपून जान्हवी ज्यावेळी घरी निघाली, त्यावेळी तिला घरी न जाता थेट रुग्णालयात जावं लागलं.
सूरज चव्हाणच्या लग्नाहून परतल्यानंतर जान्हवी कोकीलाबेन रुग्णालयात दाखल झालेली. तब्येत बिघडल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. जान्हवीनं सोशल मीडियावर रुग्णालयातले काही फोटो शेअर करुन यासंदर्भात माहिती दिलेली. जान्हवीनं त्यासोबत "नजर इज रियल" असं कॅप्शन दिलेलं. त्यावेळी चाहत्यांची चिंता वाढलेली. सर्वांनी जान्हवीच्या पोस्टवर कमेंट करुन काळजी घेण्याचं आवाहनही केलेलं. अशातच आता जान्हवी बरी होऊन घरी परतली आहे. तिनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. त्यात तिनं नेमकं काय घडलेलं, यावर स्पष्टीकरण दिलंय.
जान्हवी किल्लेकर काय म्हणालेली? (Janhavi Killekar Share VIDEO)
जान्हवी किल्लेकर म्हणाली की, "हाय हॅलो नमस्कार! व्हिडीओ बनवण्यामागचं कारण की, आता माझी तब्येत एकदम उत्तम आहे. मी पूर्णपणे बरी झालीय. फार काही झालं नव्हतं… बरेच दिवस शूटिंग, इव्हेंट्स होते, सूरजचं लग्न होतं... त्यामुळे खूप धावपळ आणि दगदग झाली. मी खूप प्रवास केला, जेवणाच्या वेळा चुकल्या, झोप पूर्ण नाही..."
"सूरजच्या लग्नात मी खूप मजा केली… खूप नाचले. त्यामुळे जरा थकवा आला होता. मला लो बीपीचाही त्रास आहे, अशा बऱ्याच गोष्टी झाल्या. पण मला संपूर्ण महाराष्ट्राला धन्यवाद म्हणायचं आहे, कारण सूरजच्या लग्नाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माणसं आली होती. फक्त त्याला शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी खूप लोक आले होते. आज सूरजचे आई-बाबा या जगात नाहीयेत, पण मला हे सांगताना अभिमान वाटतोय की, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून माणसं आलेली. जे त्याचे आई, बाबा, बहीण, भाऊ, मित्र बनून आले होते. हे खूप कौतुकास्पद आहे आणि असं नशीब फार कमी लोकांना मिळतं. जे आमच्या सूरजला मिळालं आहे.", असं जान्हवी म्हणाली.
"मला सूरजच्या लग्नात खूSSSप मजा आली. मला त्यांचे रितीरिवाज कळले, काही पद्धती आमच्याकडे होत नाहीत त्या समजल्या. त्याच्या प्रत्येक विधी मी एन्जॉय केल्या, खूप मजा आली, खूप नाचले, धमाल केली. सूरज आणि माझं बॉण्डिंग आता इतकं घट्ट झालंय की, मी प्रत्येक विधीला त्याच्यासोबत होते. खरंच हा क्षण माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण होता. सूरजसोबत मलाही प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं, बरेच नवीन मिळाले, सूरजच्या बहिणी मला मला माझ्या बहिणींसारख्याच झाल्या. अनेक नवी नाती मला मिळाली, वेगवेगळ्या विधी समजल्या...", असं जान्हवी किल्लेकर म्हणाली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :