Nashik Crime Bhushan Londhe Arrested: सातपूरमधील ओरा बार गोळीबार प्रकरणानंतर तब्बल दोन महिन्यांपासून पोलिसांना चकवून फरार असलेला मुख्य आरोपी भूषण प्रकाश लोंढे (Bhushan Londhe Arrested) अखेर नाशिक पोलिसांच्या (Nashik Police) जाळ्यात अडकला आहे. नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने उत्तर प्रदेशातील नेपाळ सीमेजवळ राबवलेल्या कारवाईदरम्यान भूषण लोंढेला ताब्यात घेतले. अटकेदरम्यान पोलिसांचा सुगावा लागताच भूषणने 34 फुटांवरून उडी मारत पलायनाचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले असून तो गंभीर जखमी अवस्थेत पोलिसांच्या ताब्यात आहे. दोन दिवसात त्याला नाशिकमध्ये आणून न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त किरण चव्हाण यांनी दिली आहे.

Continues below advertisement

भूषण लोंढे हा नाशिक शहरातील कुख्यात लोंढे टोळीचा महत्त्वाचा सदस्य असून तो PL ग्रुपचा नेता आणि रिपाइंच्या गटाचे माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांचा मुलगा आहे. प्रकाश लोंढे व त्यांचा मुलगा दीपक लोंढे हे दोघेही आधीच नाशिक पोलिसांच्या ताब्यात आहेत. गोळीबार, खंडणी, दहशत निर्माण करणे, हाणामारी, जमीन व प्लॉट हडप करणे यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. 

Bhushan Londhe Arrested: सातपूरच्या कार्यालयात आढळले होते भुयार

सातपूर परिसरात त्यांच्या कार्यालयातून सुरू असलेल्या बेकायदेशीर धंद्यांमुळे स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. तपासादरम्यान पोलिसांनी या कार्यालयावर टाकलेल्या धाडीत एक भुयारी मार्गही आढळून आला होता. तसेच नंदिनी नदीच्या काठावर महापालिकेची कोणतीही परवानगी नसताना अनधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या पक्षाच्या कार्यालयावरही संयुक्त बुलडोझर कारवाई करून तो ढासळण्यात आला होता.

Continues below advertisement

Bhushan Londhe Arrested: अनेक गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता

नोंदीवर असणाऱ्या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी संघटित गुन्हेगारीचा प्रतिबंध करण्यासाठी लोंढे टोळीविरोधात मकोका अंतर्गत कारवाई केली होती. टोळीचा मोरख्या प्रकाश लोंढे व त्याचे साथीदार न्यायालयीन कोठडीत असताना भूषण लोंढे मात्र पोलिसांना चकवून फरार होता. सातपूर, अंबड, गंगापूर आदी पोलीस ठाण्यांत त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर हाणामारी, प्रॉपर्टी हडपणे अशा अनेक गंभीर गुन्ह्यांच्या नोंदी आहेत. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी नाशिक पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गुप्त माहिती गोळा करत मोहीम राबवली. अखेर नेपाळ सीमेजवळ तो मिळून आला आणि त्याला अटक करण्यात यश आले. भूषण लोंढेच्या अटकेमुळे ओरा बार गोळीबार प्रकरणासह त्याच्या टोळीशी संबंधित अनेक गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. नाशिकमध्ये गेल्या काही वर्षात वाढत चाललेल्या संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे. 

आणखी वाचा 

Nashik Crime Prakash Londhe: विदेशी दारूच्या बाटल्या, कुऱ्हाड, चाकू....; लोंढेच्या 'गुप्त भुयारा'तून नाशिक पोलिसांना काय-काय सापडलं?