Sukh Mhanje Nakki Kay Asta : स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं!' (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेमध्ये पुन्हा एकदा प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत. कारण आता अधिराज नित्यावरचं त्याचं प्रेम व्यक्त करणार आहे. जयदीप गौरीनंतर सुख म्हणजे काय असतं या मालिकेने एका नवा अध्याय सुरु केला. जयदीप आणि गौरीचं एक नवं आयुष्य दाखवण्यात येत होतं. पण पुन्हा एकदा जयदीप आणि गौरी हे अधिराज आणि नित्या म्हणून एकत्र येणार असल्याचं पाहायला मिळणार आहे.
अधिराज हॉस्पिटलमध्ये असाताना देखील नित्याने कठोर परिश्रम करुन त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी ती कठोर असं व्रत देखील करते. त्यावेळी मी हे सगळं का करतेय मला माहिती नाही, पण त्याचा जीव वाचावा इतकचं मला वाटतं, असं नित्या म्हणते. त्यानंतर ती अधिराजजवळ हॉस्पिटलमध्ये बसून राहते. अधिराज जेव्हा शुद्धीवर येतो त्याचा आनंद नित्यालाही होता. आता अधिराज नित्यावरील त्याच्या प्रेमाचा कबुली देणार आहे. त्यामुळे आता त्याचं नातं एक नवं वळण घेणार असल्याचं म्हटलं जात आहे.
नवा प्रोमो प्रदर्शित
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये अधिराज नित्यावर त्याचं प्रेम असल्याची कबुली देतो. मोरपीस देऊन अधिराज नित्याला त्याचं तिच्यावर प्रेम असल्याचं सांगतो. ज्याप्रमाणे जयदीपने गौरीवरील त्याच्या प्रेमाचा कबुली दिली होती, त्याचप्रमाणे अधिराज नित्याला कबुली देतो. नित्या देखील अधिराजचं प्रेम मान्य करते आणि सात नाही तर सातशे जन्मांची सोबत आहे आपली, असं म्हणते.
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या नव्या पर्वानंतर अनेकांनी टीकेची झोड उठवली होती. तसेच मालिकेच्या या पर्वावर देखील अनेकांना नापसंती दर्शवली. पण पुन्हा एकदा जयदीप गौरी हे अधिराज आणि नित्या म्हणून एकत्र येणार आहेत.