Sonu Sood : मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरानं सध्या आसमामधील (Assam Flood) काही भागांमध्ये हाहाकार माजवला आहे. आसाममधील 32 जिल्हे आणि 22 लाखांपेक्षा जास्त लोक सध्या महापुराचा सामना करत आहेत. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पूरग्रस्त असलेल्या सिल्चर भागाची पाहणी केली होती. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी आसाममधील पूरग्रस्तांना मदत करत आहेत. रोहित शेट्टी आणि अर्जुन कपूर यांनी आसाममधील पूरग्रस्तांसाठी पाच लाख रुपयांची मदत केली आहे. आता अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) देखील मदत करणार आहे.
अभिनेता सोनू सूदनं ट्वीट शेअर करुन लिहिलं, 'आसामला आपली गरज आहे. आता नाही तर कधी?' या ट्वीटमध्ये सोनूनं AssamFloodsया हॅशटॅगचा वापर केला आहे. सोनूनं शेअर केलेल्या या ट्वीटला एका युझरनं कमेंट केली,'प्लीज आम्हाला मदत करा सर, आसाममधील गरिब लोक खूप अस्वस्थ आहेत. त्यांच्याकडे खायला अन्न-धान्य देखील नाहीये. ' तसेच सोनूनं एक व्हिडीओ देखील शेअर केला होता. या व्हिडीओला सोनूनं कॅप्शन दिलं, 'आसाम, माझी टीम तुमची मदत करण्यासाठी येत आहे' या व्हिडीओमध्ये सोनीनं एक हेल्प लाईन नंबर देखील शेअर केला आहे.
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (ASDMA) च्या माहितीनुसार, यावर्षी राज्यात पूर आणि भूस्खलनात जीव गमावलेल्या लोकांची संख्या 126 वर पोहोचली आहे. रविवारी बारपेटा, कचार, दररंग, करीमगंज आणि मोरीगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी चार मुलांसह पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. आसाममधील 32 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (ASDMA) दिलेल्या माहितीनुसार, बारपेटा, कछार, दरांग, करीमगंज आणि मोरीगाव जिल्ह्यातील काही भागांमध्ये पूरजन्य परिस्थिती असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर अजून दोन जण बेपत्ता आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी रविवारी कचारमधील सिल्चर आणि कामरूपमधील पूरजन्य परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी मदत आणि बचावकार्याचा आढावा घेतला.