मुंबई : अलिकडे सोशल मीडियावर अनेक तरुण तरुणी सतत बोलत असतात. सोशल मीडियाची ताकद लक्षात घेऊन अनेक कलाकार वेगवेगळ्या सोशल मीडिया साईट्सवर दाखल झाले. यात फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आदी अकाऊंट्सचा समावेश होतो. फेसबुक, ट्विटर अकाऊंट हॅक होणं नवं नाहीय. पण आता इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक व्हायचे प्रकारही वाढीस लागले आहेत. अभिनेता स्वप्नील जोशीला असाच एक अनुभव नुकताच आला. त्याने इन्स्टावर एक व्हिडिओ पोस्ट करून या प्रकाराची माहीती दिली आहे.


स्वप्नील जोशी हा मराठी आणि हिंदी सिने-टीव्हीसृष्टीत नावाजलेलं नाव आहे. अगदी लहान वयापासून तो टीव्ही मालिकांत झळकला. आता तर तो मराठी सिनेसृष्टीतला आघाडीचा कलाकार आहे. मराठी-हिंदीची ही पॉप्युलॅरिटी इन्स्टाग्रामवरही दिसू लागली. म्हणून इन्स्टावर त्याचे 1 मिलियन म्हणजे 10 लाख फॉलोअर्स आहेत. स्वप्नीलचा हा सगळा फॉलोअर ओरिजिनल आहे. अशावेळी एक दिवसापूर्वी त्याचं हे अकाऊंट हॅक व्हायचा प्रयत्न झाल्याची माहीती त्याने दिली. या व्हिडिओमध्ये माहीती देताना स्वप्नील म्हणतो, 'काल माझं अकाऊंट हॅक होतंय की काय असं मला वाटलं. कारण, मला इन्स्टाग्राम सपोर्ट या अकाऊंटवरून काही मेसेज आले. या अकाऊंटला टीक आहे. शिवाय त्याचे फॉलोअर्सही जवळपास 77 हजार वगैरे आहेत. त्या लोकांनी मला मी काहीतरी चुकीचा कंटेंट टाकल्याची माहीती मला दिली. याबद्दल मी माझ्या सोशल मीडिया टीमला याबद्दल माहीती दिली. सुरूवातीला मला काळजी वाटली. कारण जवळपास एक मिलियन फॉलोअर्सचं हे अकाऊंट आता माझ्या हातून जातंय का काय असं मला वाटलं. पण माझी सोशल मिडीया टीमने याबद्दल नीट माहिती घ्यायला सुरुवात केली. या अकाऊंटद्वारे सतत माझ्या पासवर्डची मागणी होत होती. जवळपास दोन अडीच तास हा प्रकार सुरू होता. पण मी तो दिला नाही. मी माझ्या सर्व चाहत्यांना, मित्रांना सांगू इच्छितो की कृपया आपला पासवर्ड कुणालाही देऊ नका. माझं अकाऊंट हॅक व्हायचा प्रयत्न होतोय हे आमच्या लक्षात आलं. आम्ही याविरोधात लढलो आणि हा हॅक व्हायचा प्रयत्न शेवटी मी हाणून पाडला आहे. असं मला वाटतं.'





ही माहिती देतानाच स्वप्नीलने इतरांनाही खबरदारी घ्यायचा सल्ला दिला आहे. काहीही झालं कुणीही काहीही म्हणालं तरी आपला पासवर्ड कुणाशीही शेअर करु नका असं त्याने सांगितलं. हा व्हिडिओ करतानाच स्वप्नीलने काही इतर गोष्टीही सांगितल्या आहेत. हा सगळा प्रकार सुरू असतानाचे काही स्क्रीन शॉट्सही आपण शेअर करु असं तो म्हणतो. हा व्हिडिओ शेअर करताना त्याने मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषा वापरली आहे. स्वप्नीलच्या सर्वच चाहत्यांना ही गोष्ट समजावी म्हणून आपण हा व्हिडिओ करतोय असं तो म्हणाला. त्याच्या या व्हिडिओवर त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अभिनेता माधव देवचक्के यानेही आपल्याला असे मेसेज अनेकदा आले असल्याचं म्हटलं आहे. अनेकांनी हा व्हिडिओ टाकल्याबद्दल त्याचे आभारही मानले आहेत.