मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने खासगी क्षेत्रातील मोठी बँक एचडीएफसीला मोठा झटका दिला आहे. आरबीआयने 2 डिसेंबर रोजी आदेश काढून एचडीएफसी ग्राहकांना नवे क्रेडिट कार्ड जारी करण्यावरही बंदी घातली आहे. मागील दोन वर्षात एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना डिजिटल सेवांमध्ये अनेक वेळा अडचणी आल्या. त्यामुळे आरबीआयने हे पाऊल उचललं आहे. मागील दोन वर्षात बँकेसाठी हा तिसरा मोठा झटका आहे.
बँकेकडून स्टॉक एक्स्चेंजला माहिती
आरबीआयने आदेशात सांगितलं आहे की बँकेच्या इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, पेमेंट यूटिलिटीजमध्ये सातत्याने अडचणी येत आहे. मागील दोन वर्षांपासून हे सुरु आहे. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत 21 नोव्हेंबर रोजी बँकेच्या इंटरनेट बँकिंग आणि पेमेंट सिस्टममध्ये समस्या आली होती. प्रायमरी डेटा सेंटरमध्ये पॉवर फेल झाल्यामुळे ही अडचण आली होती."
तात्पुरत्या स्वरुपात डिजिटल बिझनेसची लॉन्चिंग थांबवली
बँकेने डिजिटल बिझनेसशी संबंधित सर्व कार्यक्रमांची लॉन्चिंग तात्पुरत्या स्वरुपात रोखावी, असा सल्ला आरबीआयने दिला आहे. एचडीएफसी बँक आपलं डिजिटल 2.0 लॉन्च करण्याच्या तयारीत होती. ज्यामध्ये बरेच डिजिटल चॅनल लॉन्च होणार होते. परंतु आता आरबीआयने सर्व सेवांवर निर्बंध घातल्याने बँकेला मोठा धक्का बसला आहे. यासोबतच इतर सर्व बिझनेस जनरेटिंग आयटी अॅप्लिकेशनही रोखण्यास सांगितले आहे. यामध्ये नव्या क्रेडिट कार्ड ग्राहकांच्या सोर्सिंगवरही बंदी घालण्यात आली आहे.
आरबीआयकडून चौकशीचे आदेश
आरबीआयने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. बँकेकडून समाधानकारक उत्तर मिळाल्यानंतरच म्हणजे सर्व गोष्टी सुरळीत झाल्यानंतरच हे निर्बंध हटवले जातील असं रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलं आहे.