Will Smith : हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ (Will Smith) याने अभिनेता ख्रिस रॉक (Chris Rock) याला मारलेली थप्पड आता त्यालाच महागात पडत आहे. ‘ऑस्कर’ सोहळ्यात घडलेल्या या प्रकाराला आता अनेक महिने उमटले असले, तरी या प्रकरणाचे पडसाद आजही उमटताना पाहायला मिळतायत. याच प्रकरणामुळे एका कार्यक्रमातून अभिनेता विल स्मिथची हकालपट्टी करण्यात आली आहे. ‘SNL’ने विल स्मिथवर कायम स्वरूपी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
हॉलिवूड स्टार विल स्मिथला ‘सॅटरडे नाईट लाईव्ह’मध्ये आता सहभागी होता येणार नाहीये. 2022च्या अकादमी अवॉर्ड्समध्ये कॉमेडियन ख्रिस रॉकला थप्पड मारल्याप्रकरणानंतर या शोकडून विल स्मिथवर (Will Smith) कायमची बंदी घालण्यात आली आहे.
विल स्मिथवर बंदी घालण्याचा निर्णय!
रडार ऑनलाईनच्या वृत्तानुसार, ऑस्कर विजेता अभिनेता विल स्मिथ याला ‘SNL’ मध्ये परत कधीही आमंत्रित केले जाणार नाहीये. मार्चमध्ये पार पडलेल्या ऑस्कर सोहळ्यात विल स्मिथने (Will Smith) ख्रिस रॉकसोबत केलेले कृत्य निंदनीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आता या शोने अभिनेत्यावर बंदी घातल्याने पुन्हा या शोमध्ये विल स्मिथला पाहता येणार नाहीये. अभिनेता विल स्मिथ हा या पूर्वी शोचा महत्त्वाचा भाग होता, त्याने 1990 ते 1993 या काळात या शोमध्ये काम केले होते.
‘या’वरही बंदी!
एसएनएल या शोमध्ये विलला सामील होता येणार नाहीये. मात्र, या शोच्या प्रेक्षकांमध्ये देखील त्याला बसता येणार नाहीये. या शोने अभिनेता विल स्मिथवर कायमस्वरूपी बांधी घातली आहे. भविष्यात कधीही विल स्मिथला या मंचावर आमंत्रित करणार नसल्याचे शोच्या निर्मात्यांनी म्हटले आहे. विल स्मिथ उपस्थित राहिल्यास अनेक दिग्गज कलाकार या शोची ऑफर नाकारू शकतात, असे निर्मात्यांचे म्हणणे आहे.
... अन् विलने लगावली थप्पड!
काहीच महिन्यांपूर्वी ऑस्करचा भव्य सोहळा पार पडला. यात अभिनेता विल स्मिथने ऑस्कर 2022च्या मंचावर कॉमेडियन ख्रिस रॉकला जोरदार थप्पड लगावली. ख्रिसने स्मिथची पत्नी जाडा पिंकेट-स्मिथच्या टक्कल पडण्याची खिल्ली उडवली होती. ख्रिसने गंमतीने जाडाच्या टक्कल पडण्याचा संबंध एका हॉलिवूड चित्रपटाशी जोडला होता. मात्र, जाडा आणि विल स्मिथला ही गोष्ट आवडली नाही. या जोकनंतर संतापपेल्या विल स्मिथने (Will Smith) शोच्या मध्यातच स्टेजवर जाऊन ख्रिस रॉकला थप्पड लगावली होती.
.अभिनेत्याने मागितली जाहीर माफी!
काही दिवसांपूर्वी विल स्मिथने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये विल स्मिथने ख्रिस रॉकची जाहीर माफी देखील मागितली. व्हिडीओमध्ये व्हिल स्मिथ म्हणाला की,’मी ख्रिस रॉकची माफी मागायला गेलो होतो. पण त्याला माझ्यासोबत बोलण्याची इच्छा नाही. मला एवढचं सांगायचं आहे की, जे काही झाले त्याबद्दल मी तुझी माफी मागतो. मी जे काही केलं ते चुकीचे आहे. त्या दिवशी जे घडलं ते अत्यंत वाईट आहे. त्यामुळे मी अनेकांचे मन दुखावलं आहे’.