Ankit Tiwari : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अंकित तिवारी (Ankit Tiwari) याला नुकत्याच एका अशा परिस्थितीचा सामना करावा लागला, ज्याचा त्याला खूप मनःस्ताप झाला. अंकित तिवारी याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने आपला संताप व्यक्त केला आहे. दिल्लीतील पंचतारांकित हॉटेल रॉयल प्लाझामध्ये आलेल्या वाईट अनुभवाबद्दल तो यात बोलत आहे. अंकितने म्हटलेय की, हॉटेलच्या कर्मचार्‍यांनी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला अतिशय वाईट वागणूक दिली. त्यांच्या 3 वर्षांच्या लहान मुलीला हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी जेवणही दिले नाही.


सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत अंकित तिवारीने या पंचतारांकित हॉटेलचा गलथान कारभार उघडकीस आणला आहे. यामुळे पुन्हा एकदा पंचतारांकित हॉटेल्समधला निष्काळजीपणा समोर आला आहे.



नेमकं काय झालं?


गायक अंकित तिवारी हा आपल्या कुटुंबासोबत हरिद्वार दर्शनासाठी गेला होता. या दरम्यान तो एक दिवस दिल्लीत राहिला. यानंतर तो कुटुंबासोबत पुन्हा पुढे रवाना होणार होता. या प्रवासादरम्यान अंकित आपल्या पत्नी आणि मुलीसह दिल्लीतील रॉयल प्लाझा या हॉटेलमध्ये थांबला होता. याच हॉटेलमध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. या हॉटेलमध्ये सगळ्याच गोष्टींना उशीर होत होता. त्यांना चेक इन करण्यासाठीसुद्धा पाउण तास लागला.


या व्हिडीओत अंकित म्हणाला, दिल्लीतील या 5 स्टार हॉटेलची अवस्था इतकी वाईट आहे की, तिथे ना अन्न आहे ना पाणी. कुटुंबासह मी कुठेतरी तुरुंगात अडकलो आहे असे वाटत आहे. जेवणाची ऑर्डर देऊन 3-4 तासांहून अधिक काळ लोटला आहे. परंतु, अद्याप कुणीच आलेलं नाही. आमची लहान मुलगी उपाशी होती. तिच्यासाठी देखील आम्ही जेवणं मागवलं होतं, पण तेही आलं नाही. यामुळे माझी लहान मुलगी देखील उपाशी राहिली. तसेच, विचारणा केल्यास बाउन्सरची धमकी देण्यात आली.


अंकित तिवारीच्या या व्हिडीओवर अनेकांच्या कमेंट्स येत आहेत. अनेकांनी या हॉटेलच्या गलथान कारभारावर टीका केली आहे. हॉटेल व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणीही लोकांनी केली आहे.


हेही वाचा :