Sidhu Moosewala : दिवंगत पंजाबी गायक आणि रॅपर सिद्धू मुसेवालाच्या (Sidhu Moosewala) घरी नुकतच एका छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. त्याच्या आईवडिलांनी सिद्धुच्या जाण्यानंतर पुन्हा एकदा पालक होण्याचा निर्णय घेतला. 58 व्या वर्षी सिद्धुची आई चरण कौरने IVF माध्यमातून एका मुलाला जन्म दिला.  चरण कौर यांनी IVF म्हणजेच इन विट्रो फर्टिलायझेशन (In Vitro Fertilisation) या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बाळाला जन्म दिला आहे. 


सिद्धू मुसेवालाच्या वडिलांनी बलकौर सिंह (Balkaur Singh) यांनी 17 मार्च रोजी सकाळी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत मुलगा झाल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. त्यांच्या या फोटोमध्ये त्यांच्यासोबत बाळ देखील दिसत आहे. पण त्यांच्या या बाळाचं नाव काय याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. 


सिद्धुच्याच नावावरुन धाकट्या मुलाचं नाव


नुकतच एका व्हिडिओमध्ये सिद्धुच्या वडिलांनी म्हटलं होतं की, त्यांनी सिद्धुच्या नावावरुनच त्यांच्या धाकट्या मुलाचं नाव ठेवलं आहे. मुसेवाला घरातील धाकट्या मुलाचं नाव हे 'शुभदीप' असं आहे. माझा जो मुलगा गेला तोच परत आला आहे. त्यांच्यात सगळं काही सारखचं आहे. ही वाहेगुरुंची कृपा आहे. बलकौर सिंह यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल झालाय. 






सिद्धुच्या आईवडिलांचा पालक होण्याचा निर्णय


सिद्धू मुसेवालाची 29 मे 2022 रोजी हत्या करण्यात आली होती. गोल्डी बरार आणि लॉरेन्स बिश्नोई यांनी ही हत्या केल्याचं समोर आलं होतं. त्याच्या हत्येनंतर त्याचे आई-वडील मात्र एकटे पडले होते. त्यामुळे IVF च्या मदतीने त्यांनी पुन्हा पालक होण्याचा निर्णय घेतला. आता मुसेवाला घराण्याला मिळालेल्या नव्या वारसदाराची चर्चा आहे. सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सिद्धूला भाऊ झाल्याने चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मुसेवालाचा नवा वारसदारदेखील गायक व्हावा, अशी इच्छा ते व्यक्त करत आहेत. सिद्धूच्या निधनाला दोन वर्ष पूर्ण होणार आहेत. पण आजही त्याची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. त्याची गाणी चाहते आवडीने ऐकतात.


ही बातमी वाचा : 


Sidhu Moosewala : सिद्धू मुसेवालाची 58व्या वर्षी आई झाली ते तंत्रज्ञान आहे तरी काय? सर्व महिलांना शक्य आहे का?