मुंबई : लॉकडाऊन काळात चित्रिकरणं सुरू व्हावीत म्हणून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नवी नियमप्रणाली जाहीर केली आहे. आता सिनेमा, टीव्ही आणि वेबसीरीज यांना चित्रिकरण करायचं असेल तर हे नियम पाळावे लागणार आहेत. यात सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंग यांच्या सूचना आहेतच. पण आता नव्या नियमावलीनुसार सेटवरच्या प्रत्येकाला मास्क सक्तीचा असणार आहे. केवळ कॅमेऱ्यासमोर उभे असणाऱ्या कलाकारांनाच मास्क काढता येणार आहे.
मेकअप आणि हेअर ड्रेसरला पीपीई किट बंधनकारक
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ही नवी नियमावली जारी केली आहे. यात सेटवरच्या सर्वांनी फेस कव्हर आणि मास्क वापरणं सक्तीचं असणार आहे. तर मेकअप आणि हेअर करणाऱ्यांनी पीपीई किट घालणं बंधनकारक असणार आहे. कॉलर माईक्स शक्यतो वापरले जाऊ नयेत किंवा वापरले गेलेच तर ते इतर कुणाची शेअर होऊ नयेत असंही यात सांगण्यात आलं आहे. चित्रिकरणासाठी लागणाऱ्या प्रॉपर्टीसुध्दा कमीतकमी वापरल्या जाव्यात आणि त्या वापरण्यापूर्वी त्याचं निर्जंतुकीकरण करणं सक्तीचं असणार आहे.
6 फुटांचं अंतर पाळावं लागणार
याशिवाय, चित्रिकरण स्थळी एडिटिंग रूममध्ये आणि रेकॉर्डिंग रूम स्थळी किमान 6 फुटांचं अंतर पाळावं लागणार आहे. चित्रिकरण करायचं दृश्य, कॅमेरामन, क्रू पोझिशन्स, बसायची व्यवस्था, खानपानाच्या व्यवस्था असलेल्या ठिकाणी हा नियम पाळावा लागणार आहे. सेटवर कमीतकमी कलाकार आणि तंत्रज्ञ असावेत. बाहेरील कोणालाही सेटवर येण्याची परवानगी नसावी. सर्वत्र सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाव. सेटवर प्रवेश आणि गमन ही ठिकणं निश्चित करावीत. सेट, व्हॅनिटी व्हॅन्स, मेकअप रूम्स आदी ठिकाणी वारंवार सॅनिटायझेशन बंधनकारक असणार आहे. सेटवर ग्लोव्हज, बूट, मास्क, पीपीई यांची व्यवस्था असावी. सर्वांकडे आरोग्य सेतू अॅप आसावा,असे नियम यात करण्यात आले आहेत.
ज्येष्ठ कलाकारही सेटवर येऊ शकणार
कोरोनाला आळा घालण्यासाठी हे नवे नियम करण्यात आले आहेत. आता ज्येष्ठ कलाकारही सेटवर येऊ शकणार आहेत. त्या कलाकारांचीही योग्य काळजी घेतली जावी, असं यात सुचवण्यात आलं आहे. सॅनिटायझेशन, त्यांची बसण्याची व्यवस्था, खानपानाची व्यवस्था इथे सर्वत्र फिजिकल डिस्टन्सिंग पाळलं जाणं गरजेचं असल्याचंही यात म्हटलं आहे. आता चित्रिकरण करायचं असेल तर हे नियम पाळूनच चित्रिकरण करावं लागणार आहे.
Shooting Guidelines : सेटवर मास्क सक्तीचा, सोशल डिस्टन्सिंग 6 फुटांचे, चित्रिकरणासाठी नवे नियम
सौमित्र पोटे, एबीपी माझा
Updated at:
23 Aug 2020 02:54 PM (IST)
Shooting Guidelines : लॉकडाऊन काळात चित्रिकरणं सुरू व्हावीत म्हणून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नवी नियमप्रणाली जाहीर केली आहे.
आता चित्रिकरण करायचं असेल तर हे नियम पाळूनच चित्रिकरण करावं लागणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -