Shah Rukh Khan Birthday : अभिनेता शाहरुख खान (Bollywood Actor Shah Rukh Khan Birthday) याचा आज 57 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने वांद्रे इथल्या निवासस्थानी म्हणजेच शाहरुख खानच्या 'मन्नत' बंगल्याबाहेर मध्यरात्री चाहत्यांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. शाहरुख खानच्या फॅन्सकडून मन्नत बंगल्याबाहेर वाढदिवस साजरा करण्यात आला.
मन्नत घराबाहेर फटाके फोडून आतिषबाजी
शाहरूखच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या संख्येने चाहते जमा झाले होते. तसेच शाहरुख खान याच्या 'मन्नत' घराबाहेर फटाके फोडून आतिषबाजी करण्यात आली. यावेळी शाहरुख खान स्वतः घराच्या गेटवर येत सर्वांचे शुभेच्छा स्वीकार करत असल्याचं दिसला. तसेच शाहरुख खान आपल्या चाहत्याकडून शुभेच्छा स्वीकार करत असताना आपल्या मोबाईल मधून चाहत्यांसोबत सेल्फी घेतानाही दिसला.
मध्यरात्री फॅन्सकडून जल्लोषात वाढदिवस साजरा
गेली दोन वर्षे भारतात कोरोनाचे सावट असल्यामुळे शाहरुख खान याच्या चाहत्यांकडून वाढदिवस साजरा करता आला नव्हता. मात्र यावर्षी राज्यामधून कोरोनाची संख्या कमी झाल्यामुळे शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त मध्यरात्री त्याच्या घराबाहेर चाहत्यांकडून जल्लोषात वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.
टेलिव्हिजनवरून रुपेरी पडद्यावरील जादू कायम
2 नोव्हेंबर म्हणजेच आज रोजी बॉलिवूड किंग अभिनेता शाहरुख खानचा वाढदिवस आहे. 2 नोव्हेंबर 1965 रोजी दिल्लीत जन्मलेल्या शाहरुखने टेलिव्हिजनवरील मालिकांमधून आपला ठसा उमटवल्यानंतर चित्रपटांकडे वळला आणि रुपेरी पडद्यावरचा त्याचा पहिला चित्रपट "दीवाना" होता. 'डर', 'अंजाम' आणि 'बाजीगर' सारख्या काही चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका केल्या. 'राजू बन गया जेंटलमन' आणि 'फिर भी दिल है हिंदुस्तानी', 'डुप्लिकेट' किंवा 'देवदास', 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'माय नेम इज खान' आणि 'चक दे' सारख्या हलकेफुलक्या चित्रपटांमधून शाहरूख घराघरात पोहोचला. शाहरुख खानने 'रईस' आणि 'डॉन' सारख्या चित्रपटातही क्राइम गँगस्टरची भूमिका साकारली. शाहरुख खान तीन दशकांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.
चोरांकडून गर्दीचा फायदा, पोलिसांचा बंदोबस्त
अभिनेता शाहरुख खान हे आज 56 वर्ष पूर्ण करून 57 वर्षात पदार्पण करणार आहेत. शाहरुख खान याच्या चाहत्यांकडून रात्री 12 वाजता वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येत निवास्थानी 'मन्नत' बंगल्याबाहेर गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत लोकांच्या मोबाईल आणि पॉकेट देखील चोरी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती, अशा चोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी सिव्हील ड्रेसमध्ये बंदोबस्त केले असल्याचे पाहायला मिळाले.