Seema Chandekar : अभिनेत्री सीमा चांदेकर (Seema Chandekar) या अनेक मालिका, सिनेमे आणि नाटकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. त्याचप्रमाणे त्या अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या आई आहेत. सीमा चांदेकरांच्या अनेक भूमिका प्रेक्षकांच्या पंसतीस पडल्या आहेत. पण काही वर्षांपूर्वी सीमा चांदेकर यांनी घेतलेल्या एका निर्णयाची विशेष चर्चा झाली. सीमा चांदेकर यांनी वयाच्या 57 व्या वर्षी पुन्हा एकदा लग्न करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये त्यांना त्यांच्या घरतल्यांनी देखील खंबीर पाठिंबा दिली.
वयाच्या या टप्प्यात आल्यानंतर आयुष्यात जोडीदाराची गरज का भासली या सगळ्या मुद्द्यांवर सीमा चांदेकर यांनी नुकतच आरपार ऑनलाईनला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. तसेच हा निर्णय त्यांनी का घेतला याचं कारणही सीमा चांदेकरांनी सांगितलं आहे.
सीमा चांदेकर यांनी काय म्हटलं?
पुन्हा लग्न करण्याच्या मुद्द्यावर बोलताना सीमा चांदेकर यांनी म्हटलं की, 'पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घ्यायलाही मला खूप वर्ष लागलीत. असं नाहीये की, आता मूलं सेटल झाली आहे, त्यांचं सगळं सुरळीत सुरु आहे, ते माझ्याबरोबरच होतेच ना. त्यामुळे मला एकटं वाटावं असं काही कारण नव्हतं. पण तीन वर्षांपूर्वी माझा अपघात झाला होता. बाईकने मला धडक दिली होती. माझ्या उजव्या हातामध्ये प्लेट होती. मी कुठेही जाऊ शकत नव्हते. मुलं होतीच. त्यांना जसा वेळ मिळायचा तसे ते यायचे. पण या वयात लग्न करणं म्हणजे बाकी कोणत्या गरजेसाठीच करतोय असं नाहीये. आज आपल्यासमोर अशाही अनेक बायका आहेत, ज्या त्यांचं आयुष्य एकटीने घालवण्यासाठी समर्थ आहेत आणि मला त्यांचा खूप अभिमान वाटतो. मी मात्र त्यांच्यापेक्षा एक पाऊल मागे पडले असेन. कारण मी कायम माणसात राहिलेय. माझी मुलं कायम माझ्यासोबत होती. पण त्या अपघाताच्या वेळी मला कुठेतरी एकटेपणा आला.'
पुढे त्यांनी म्हटलं की, 'म्हणजे आता मला असं झालं की,आज माझी कामवाली बाई आली नाहीये आणि मला असा असा त्रास झाला. हे मी सिद्धार्थला फोन करुन नाही सांगू शकत. मुलंही हे सगळं ऐकतात पण त्यांच्याकडे तो वेळ हवा. हे सगळं मला कुठेतरी जाणवायला लागलं. त्यानंतर माझी चिडचिड व्हायला लागली. माझ्यात आणि मुलांमध्ये त्यावरुन वाद व्हायला लागले. पण मग एकदा बोलता बोलता सिद्धार्थ म्हणाला की, आई काय हरकत आहे पुन्हा विचार करायला. त्यानंतर मी माझ्या मैत्रीणींशी बोलले. कारण मला आगीतून फुफाट्यात यायचं नव्हतं. रात्र रात्र झोप यायची नाही, खूप विचार केला. यासाठी मला माझ्या सासरच्याही लोकांनी पाठिंबा दिला.'