Shubhangi Sadavarte Divorce: बॉलिवूड (Bollywood News) इंडस्ट्री आणि त्यातले घटस्फोट (Divorce) आपल्याला काही नवे नाहीत. पण, आता हे पेव मराठी इंडस्ट्रीतही (Marathi Industry) येऊन पोहोचलं आहे. काही दिवसांपूर्वीच मराठीतील सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांनी आपल्या घटस्फोटाबाबत सोशल मीडियावरुन जाहीर केलं. लग्नाच्या 17 वर्षांनी राहुल देशपांडे यांनी घटस्फोट घेतला. अशातच आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या संसाराचा काडीमोड झाला आहे. 'संगीत देवभाबळी' नाटकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी सदावर्ते आणि संगीतकार आनंद ओक एकमेकांपासून विभक्त झाले आहेत. स्वतः आनंद ओक यांनी याबाबत माहिती दिली.
'संगीत देवभाबळी' फेम अभिनेत्री शुभांगी सदावर्ते आणि संगीतकार आनंद ओक यांनी 2020 मध्ये आपली लग्नगाठ बांधलेली. मात्र, आता लग्नाच्या पाच वर्षांतच दोघांनीही घटस्फोट घेतला आहे. रंगभूमी गाजवणाऱ्या या जोडीनं घेतलेल्या या निर्णयामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
संगीतकार आनंद ओक यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन घटस्फोटाबद्दल माहिती दिली आहे. "आम्ही काही वर्षांपूर्वीच वेगळे झालो होतो, पण आता हा निर्णय जाहीर करण्यासाठी योग्य वेळ आहे...", असं आनंद ओक यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
आनंद ओक यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये काय म्हटलंय?
"आम्ही एकत्र घालवलेल्या प्रत्येक क्षणाबद्दल मी कृतज्ञ आहे. तसंच मी शुभांगीला तिच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो... शुभांगी एक उत्कृष्ट अभिनेत्री आणि चांगली व्यक्ती आहे... भविष्यात जेव्हा संधी मिळेल, तेव्हा आम्ही दोघेही पूर्वीसारखेच एकत्र काम करू...", असं आनंद ओक यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, शुभांगी सदावर्तेच्या कामाबद्दल सांगायचं तर, सध्या रंगभूमीवर गाजणाऱ्या 'संगीत देवबाभळी' नाटकात शुभांगीनं संत तुकारामांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. शुभांगीच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. तर, आनंद ओक यांनी 'संगीत देवबाभळी' या नाटकाला संगीत दिलं आहे. प्राजक्त देशमुख दिग्दर्शित 'संगीत देवबाभळी' नाटक काही प्रयोगांनंतर बंद करण्यात आलेलं. पण, त्यानंतर प्रेक्षकांच्या आग्रहास्तव नाटक पुन्हा सुरू करण्यात आलं. सध्या 'संगीत देवबाभळी' नाटक संपूर्ण महाराष्ट्रभरात हाऊसफुल्ल सुरू आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :