Vaibhav Khedekar : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटक वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) यांची पक्षविरोधी कारवायांमुळे मनसेतून काही दिवसांपूर्वी हकालपट्टी करण्यात आली होती. वैभव खेडेकर हे भाजप (BJP) किंवा शिवसेना शिंदे गटात (Shiv Sena Shinde faction) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगताच त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. यानंतर वैभव खेडेकर 4 सप्टेंबर रोजी भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा उपस्थितीत प्रवेश करणार असल्याची माहिती भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत दिली होती. मात्र, आता वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडल्याची माहिती समोर येत आहे.   

आज मुंबईत वैभव खेडेकर यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश होणार होता. मात्र, आज होणारा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आता पुढे ढकलण्यात आला आहे. मागील आठ दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला चर्चेत आला होता. मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर पाच दिवस आमरण उपोषणासाठी बसले होते. मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण मागे घेतल्यानंतर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा राज्यात चर्चेत आला आहे. नागपूरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाने साखळी उपोषण सुरू आहे. तसेच राज्यात इतर अनेक ठिकाणी ओबीसी समाजाकडून उपोषण सुरु आहेत. ओबीसी आरक्षणचा मुद्दा चिघळल्याने आपला पक्षप्रवेश स्थगित करण्यात आल्याची माहिती वैभव खेडेकर यांनी दिली आहे. पक्ष प्रवेशाची पुढची तारीख लवकरच निश्चित होणार आहे, असे देखील त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे वैभव खेडेकर यांचा पक्ष प्रवेश लांबणीवर पडल्याचे दिसून येत आहे. 

पक्षांतर करत असल्याच्या संशयावरून माझ्यावर कारवाई : वैभव खेडेकर

दरम्यान, मनसेतून हकालपट्टी झाल्यानंतर वैभव खेडेकर यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली होती. मी भाजपच्या काही लोकांना भेटलो.  म्हणून मी पक्षांतर करत असल्याच्या संशयावरून माझ्यावर कारवाई करण्यात आली. पण मी पक्षप्रवेश करणार नव्हतो. कार्यकर्त्याला तडीपारीची होणारी कारवाई थांबावी म्हणून मी नितेश राणे यांना भेटलो होतो. विकास होणे महत्वाचे असल्याने सत्ताधाऱ्यांना भेटायचो. त्यामुळेच माझ्यावर कारवाई झाली. मात्र, माझ्याबद्दल संशय निर्माण केला गेला. याबद्दल मी राज ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण, मला अद्याप भेट मिळालेली नाही, असे वैभव खेडेकर यांनी म्हटले होते. 

आणखी वाचा 

Manoj Jarange Patil on Raj Thackeray : राज ठाकरे कुचक्या कानाचा, मानाचा भुकेला, फडणवीस घरी येऊन चहा घेऊन गेल्यानंतर पक्ष बर्बाद झाला तरी चालतो; मनोज जरांगेंची घणाघाती टीका