Salman Khan Video : ‘स्वर सम्राज्ञी’ भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाच्या दु:खातून त्यांचे चाहते अजून बाहेर येऊ शकलेले नाहीत. लता दीदींच्या निधनानंतर संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने सर्वांनाच दुःख झाले आहे. अनेक बॉलिवूड स्टार्सनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्यासोबत घालवलेल्या वेळेला उजाळा दिला.


बॉलिवूडचा भाईजान सलमान खाननेही (Salman Khan) लता मंगेशकर यांना त्याच्या खास शैलीत आदरांजली वाहिली आहे. त्याने लतादीदींचे आयकॉनिक गाणे गायले आहे. ज्याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.


पाहा व्हिडीओ :



सलमानने लता मंगेशकर यांचे 'लग जा गले' हे गाणे गातानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये तो हे आयकॉनिक गाणे गाताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, ‘लताजींसारखे कोणी नाही आणि कोणीही नसणार.’ सलमान खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये त्याच्या चेहऱ्यावरचे दुःख स्पष्टपणे दिसत आहे.


लता मंगेशकर यांनी 6 फेब्रुवारीला या जगाचा निरोप घेतला. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिथे त्यांच्यावर जवळपास महिनाभर उपचार सुरू होते. लतादीदींनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला.


लता मंगेशकर यांच्यावर शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शाहरुख खान, आमिर खान, रणबीर कपूर आणि सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक कलाकारांनी शिवाजी पार्कवर जाऊन लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली. लतादीदींचे चाहते फक्त भारतातच नाही, तर जगभरात आहेत. परदेशातही अनेकांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लतादीदींना श्रद्धांजली वाहिली होती.    


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha