Gulabi Sadi :  सध्या अगदी सामान्य माणसापासून ते सेलिब्रिटी लोकांना वेड लावणारं 'गुलाबी साडी' (Gulabi Sadi) हे गाणं जगभर गाजतंय. आजपर्यंत लाखो रिल्स या गाण्यावर करण्यात आलेत. हे गाणं लिहिणारा संजू राठोड (Sanju Rathod) हा चांगलाच प्रकाशझोतात आला. संजूची आतापर्यंतही गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस पडत होती, पण त्याच्या या गाण्याने त्याला विशेष प्रसिद्धी दिली. इतकच नव्हे तर फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातही त्याला हे गाणं सादर करण्याची संधी मिळाली. पण या गुलाबी साडीने कसं आयुष्य बदललं याविषयी संजूने एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. 


गुलाबी साडी हे गाणं कसं सुचलं आणि ते गाणं कसं लिहिलं याविषयी संजूने याआधीही सांगितलं होतं. त्यानंतर त्याने त्याचा प्रवास देखील सांगितला होता. दरम्यान युट्युबकडून सुरुवातीला पैसे मिळूनही ते माझ्यापर्यंत सुरुवातीला पोहचलेच नाही, असा देखील खुलासा संजूने यावेळी केला आहे. यामध्ये संजूच्या भावाने त्याला खंबीर साथ दिल्याचंही त्याने सांगितलं. जे कर्ज झालं होतं, पण गाण्यांमुळे तेही फेडून टाकल्याचं संजूने सांगितलं. 


गुलाबी साडीने आयुष्य कसं बदललं?


एबीपी माझासोबत बोलताना संजूने गुलाबी साडी या गाण्यामुळे आयुष्य कसं बदललं याविषयी भाष्य केलं आहे. संजूने म्हटलं की, यामागे खूप वर्षांची मेहनत आहे. मी माझ्या आयुष्यातली जवळपास सहा ते सात वर्ष त्यामध्ये घालवलीत. गरीब घरातून आलेला एक मुलगा, ज्याच्याकडे घराचं भाडं भरायलाही पैसे नाहीत, ते म्युझिक व्हिडिओ बनवतो. त्यामागे बरीच मेहनत आहे. मी व्याजाने पैसे घ्यायचो आणि व्हिडिओ बनवायचो. त्यानंतर व्याजावर व्याज चढल्याने कर्ज वाढत गेलं. घरच्यांना याविषयी कल्पना नव्हती. जेव्हा व्याज ज्यांकडून घेतलं ती माणसं घरी गेलीत, तेव्हा घरच्यांना कळलं. तेव्हा मी घरच्यांना सांगितलं की माझ्यावर कर्ज आहे. 


पुढे काय करणार?


संजूने त्याच्या भविष्यातील प्लॅनिंगविषयी बोलताना सांगितलं की,  मला आता भारतभर मराठी गाण्यांचे कॉन्सर्ट्स करायचे आहेत. मला सुरुवातीपासून हे करायची इच्छा होती. मला प्रत्यक्षात लोकांशी जोडलं जायचं आहे. दिलजीत दोझांज माझा आयडॉल आहे. मला मुंबईतही घर घ्यायचं आहे. दरम्यान बॉलीवूडमध्येही जाण्याची इच्छा असल्याचं यावेळी संजूने सांगितलं. त्याचप्रमाणे मराठी आणि हिंदीतूनही आता काही प्रोजेक्ट्स सुरु असून बऱ्याची ठिकाणी माझी चर्चा सुरु असल्याचंही संजूने एबीपी माझाला सांगितलं. 



ही बातमी वाचा : 


Sanju Rathod : जगभरात गाजलेलं 'गुलाबी साडी' हे गाणं लिहिणारा संजू राठोड आहे तरी कोण? इंजिनीअरिंगचा अभ्यास करताना गवसली संगीताची वाट