फॅशन इंडस्ट्रीमध्ये बोटावर मोजण्याइतपत कमी लोकांनी भरारी घेतली आहे. त्यातलंच एक प्रमुख नाव होतं स्वप्नील शिंदे. स्वप्नीलचा इन्स्टाग्रामवरचा फॉलोअरही मोठा आहे. स्वप्नील त्यावर सतत काहीतरी टाकत असायचा. पण अचानक काही महिन्यांपासून स्वप्नीलचं ते अकाऊंट फार दिसेनासं झालं आणि अचानक परवा त्या अकाऊंटवर एका सुंदर तरुणीचे फोटो पडले. बॉलिवूड सुंदरीला लाजवेल अशी तिची छबी होती. दोनेक फोटो पडल्यानंतर एक पत्र इन्स्टावर पडलं तेव्हा अनेकांच्या लक्षात एक बाब आली. स्वप्नील शिंदे नावाच्या फॅशन कोरिओग्राफरने आता कात टाकली होती आणि त्यातून साईशा शिंदेचा जन्म झाला होता. याच साईशाला एबीपी माझाने बोलतं केलं.


प्रश्न - हाय साईशा, तुझं अभिनंदन आणि खूप कौतुक. खरंतर खूपच मोठं धाडसी पाऊल उचललंस तू. हा निर्णय का घ्यावा वाटला?


साईशा- गेल्या अनेक महिन्यांपासून माझ्या डोक्यात हे विचार येत होते. आपल्याकडे लिंगभेद खूप आहे. कामाच्या निमित्ताने पाश्चात्य देशांमध्ये मी जायचे. तर तिथे मला काही अशी उदाहरणं पाहायला मिळाली होती. तिथे ती मंडळी उत्तम जगताना दिसत होती. आपल्याकडेच लिंगभेदाबद्दल चेष्टा केली जाते. एखाद्या व्यक्तीने गे असणं हा चेष्टेचा विषय होतो. मला ते थांबवायचं होतं. साईशा होण्याचा निर्णय मी घेतलाच. पण तो घेतानाच मला आपल्या समाजालाही उत्तर द्यायचं आहे. मला त्यांना सांगायचं होतं. शेवटी माणूस कर्तृत्वाने मोठा असतो. आपल्याकडच्या पालकांनीही मुलांचं संगोपन करताना आपलं मूल म्हणून कारायला हवं. मुलगा-मुलगी हा भेद ठेवता कामा नये. आपण एक लक्षात घ्यायला हवं की हा भावनेचा भाग असतो. कुणी ते मुद्दाम करत नसतं. त्या त्या गोष्टीला तो तो आदर मिळायला हवा. म्हणून अत्यंत विचार करून मी हे पाऊल उचललं.


स्वप्नीलची 'साईशा'; सौंदर्य पाहून नेटकरी, सेलिब्रिटीही घायाळ


प्रश्न - असं धाडसी पाऊल उचलायचं असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकांचा पाठिंबा असणं आवश्यक असतं. तू जेव्हा साईशा होण्याचा निर्णय घेतलास, तेव्हा तुझ्या जवळच्या वर्तुळातून काय प्रतिक्रिया होती?


साईशा - मी हा निर्णय घेतल्यानंतर मला सगळ्यात चांगला पाठिंबा मिळाला तो माझ्या वडिलांकडून. त्यांनी फार आधीपासूनच मला पाठिंबा दिला होता. तू तुला जे हवं आहे ते मिळव. बाकीचं मी बघून घेतो असं त्यांचं धोरण होतं. त्यामुळे साईशा होण्याचा निर्णय मी घेतल्यानंतर मला त्यांच्याकडून पूर्ण पाठिंबा होता. तुम्ही जेव्हा असा निर्णय घेणार असता तेव्हा तुमच्या कुटुंबाकडून तुम्हाला पाठिंबा मिळणं सर्वात महत्वाचं असतं.


प्रश्न - असं ट्रान्सफॉर्मेशन करवून  समाजाला काय सांगायचं आहे तुला?


साईशा - आपल्याकडे गे लोकांबद्दल फारच गैरसमज आहेत. आपल्या मुलाला किंवा मुलीला जेंडर इश्यूज असू शकतात. पण आपल्या पालकांना हे समजूनच घ्यायचं नसतं. मुळात हा इश्यू समजून घ्यायला हवा. अनेकांना वाटतं हा काहीतरी आजार आहे.. किंवा आपला मुलगा किवा मुलगी गे असेल तर त्यांना फारच तीव्र नकारात्मक वर्तणुकीचा सामना करावा लागतो. माझ्या जनरेशनची ती जबाबदारी आहे की लोकांना सांगणं. असे इश्यू असतील तर ते सॉल्व करता येतात हेच मला सांगावं वाटतं.


प्रश्न- साईशाला आजवरचा सगळ्यात मोठा संघर्ष कधी करावा लागला?


साईशा - लोकांना आपल्याला आपण आहोत तसे स्विकारावं हाच पहिला मोठा स्ट्रगल असतो. तो स्वीकार व्हायला हवा. फॅमिलीने, मित्रांनी, सोसायटीने स्विकारलं पाहिजे. माझ्याबाबतीत मलाच तो स्विकार करता येत नव्हता. आमच्यावेळी ती इन्फर्मेशन नव्हती. मी शाळेत असताना, कॉलेजमध्ये असताना मलाच कळत नव्हतं काय चालू आहे. आता तसं राहिलेलं नाही. आता इंटरनेट आहे. जगभरातल्या गोष्टींशी तुम्ही जोडले जाता. आता लोकांना ही माहीती द्यायची गरज आहे. ती योग्य पद्धतीने दिली गेली तर आणि तरच आम्हाला स्विकारलं जाईल.


प्रश्न - इन्स्टावर तू तुझे फोटो टाकल्यावर काय प्रतिक्रिया आल्या? 


साईशा - इन्स्टावर फोटो टाकल्यानंतरच्या प्रतिक्रियांनी मी चकित झाले. आपल्या समाजात असणाऱ्या ट्रान्सजेंडर्सचे, गे संघटनांच्या सदस्यांचे कौतुकाचे मेसेज, कमेंट्स येणं मी समजू शकत होतं. ते अपेक्षित होतं. पण त्या पलिकडे सामान्य स्त्री-पुरुषांचेही माझं कौतुक करणारे..अभिनंदन करणारे फोन येऊ लागले. मला हे चकित करणारं होतं. मला ज्या काही हजार कमेंट्स आल्या आहेत, त्यातल्या फक्त तीन-चार नकारात्मक आहेत. बाकी सगळ्या खूपच सकारात्मक. अनेकांनी अभिनंदन केलं आहे. तर त्यातल्या काहींनी आपणही आता असा निर्णय विचार करून घेऊ असं सांगितलं आहे. ही एक चळवळ आहे. केवळ एखादी व्यक्ती गे आहे म्हणून तुम्ही तिची चेष्टा करू शकत नाही. त्यातून आता बाहेर येण्याची हीच वेळ आहे. माझी जनरेशन त्यातून गेली आहे. माझ्या आधीच्या जनरेशनला यातलं काहीच माहीत नव्हतं. पण आता येणाऱ्या जनरेशनसाठी तरी तो विचार व्हायला हवा. माणूस म्हणून ट्रिटमेंट मिळायला हवी.


प्रश्न - या फोटोत तू फारच सुंदर दिसतेयस. तुझं दिसणं तू आधी ठरवलं होतंस का?


साईशा - साधारण मी कशी दिसायला हवी त्याचा अंदाज मला आला होता. पण ही सर्जरी करूनही काही महिने झालेत. त्यातून मलाही मी नव्याने कळते आहे. एका अर्थाने हे संक्रमण आहे. कारण हा निर्णय एकदा घेतला की तुम्ही त्या निर्णय़ाशी ठाम कायम राहावे लागता. सध्या माझे फोटो जरी इन्स्टावर आले असले तरी अजून ६० टक्के मी अजून बरी होणं अपेक्षित आहे. मी गेले तीनेक महिने झाले स्त्रीसारखा पोशाख करून ऑफिसला येऊ लागले आहे. त्यामुळे सध्या मीच मला समजून घेते आहे. पण माझी पर्सनल आयडेंटिटी काय होणार आहे, ते मी अजून ठरवलं नाहीय पण ती युनिक असेल.


प्रश्न - तू फोटो इन्स्टावर टाकल्यानंतर इंडस्ट्रीच्या लोकांच्या काय प्रतिक्रिया होत्या?


साईशा - मला इंडस्ट्रीतून खूपच चांगला पाठिबा मिळाला. केवळ हिंदीच नव्हे तर मराठीसुद्धा. सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी या सगळ्यांनीच मला पाठिंबा दिलाय. अजूनही मेसेज येतायत. पण सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया येणं मला सुखावून जाणारं आहे.


प्रश्न - जसं तू म्हणालीस, की समाजाला दिलेलं हे उत्तर आहे. आता यापुढे ही चळवळ कशी होईल?


साईशा - सध्या माझं ४० टक्के ट्रान्झिशन झालं आहे. कोव्हिडमुळे त्याला थोडा विलंब झाला. पण ते पूर्ण झालं की मी या टॉपिकवर खूप बोलायला लागेन. मी दिग्दर्शक, निर्मात्यांना भेटेन. आमच्या कम्युनिटीला हसण्यावारी नेऊ नये असं मला वाटतं. थोड्या मोठ्या स्केलवर विचार करायचा तर मला या गोष्टी नॉर्मलाईज करायच्यात. कारण, मी गे असणं हे लोकांना ऑड वाटू नये.