मुंबई : नोकरीचे आमिष दाखवून अहमदनगरमध्ये एकाची फसवणूक करण्यात आलीय. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात सैराट (Sairat marathi movie) फेम प्रिन्स अर्थात अभिनेता सुरज पवार (Suraj Pawar) याचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आता सुरजला अटक होण्याची शक्यता आहे. राहुरीचे पोलीस लवकरच सुरज पवार याला अटक करणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिलीय. त्यामुळे सैराट नंतर सुरज आता पुन्हा एकदा चर्चेत आलाय. 


सैराट’ चित्रपट आल्यानंतर आर्ची, परश्या, लंगड्या, सल्या, प्रिन्स यांची क्रेझ सर्वांमध्येच पाहायला मिळाली. यात आर्चीच्या भावाची म्हणजे परश्याचा मेहुणा ‘प्रिन्स’ची भूमिका सुरज याने साकारली होती.  परंतु, त्याआधी सुरज याने नागराज मंजुळे यांच्या सर्वच चित्रपटात काम केलंय. असं म्हटलं जातं की, नागराज मंजुळे हे एका चित्रपटात काम केल्यानंतर त्या कलाकाराला दुसऱ्या चित्रपटात घेत नाहीत. परंतु, सुरज हा एकमेव असा कलाकार आहे, ज्याने नागराज यांच्या सुरूवातीपासून आतापर्यंतच्या सर्वच चित्रपटात काम केलंय. 


सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील पोफळज गावचा सुरज सैराट चित्रपटामुळे देशभरात प्रसिद्ध आहे. अलीकडे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबतही त्याने ‘झुंड’मध्ये स्क्रीन शेअर केली आहे.  ‘झुंड’मध्ये त्याने गेस्ट अपियरन्सची भूमिका साकारली आहे. नागराज यांच्या पिस्तुल्या या लघुचित्रपटातून सुरज याच्या चित्रपट करिअरला सुरूवात झाली. 


‘पिस्तुल्या’मध्ये पारधी समाजातील मुलगा, ‘फँड्री’तील जब्याच्या मित्राची भूमिका सुरज याने साकारली होती. सुरजने वयाच्या केवळ 15 व्या वर्षी खलनायक साकारला. परंतु, अहमदनगरच्या फसवणूक प्रकरणामुळे आता तो खऱ्या आयुष्यात देखील खलनायक ठरतोय की काय? असा प्रश्न निर्माण झालाय.  


मास्तरांच्या भीतीने सुरज याने शाळा अर्धवट सोडली होती. परंतु,आईच्या मृत्यूनंतर  सुरजने पुन्हा शिक्षण सुरू केलंय. तो नागराज मंजुळेंसोबत पुण्याला राहतोय. ‘पिस्तुल्या’मधील या हिरोनं ‘सैराट’मध्ये खलनायकाच्या भूमिकेतही एक वेगळी छाप पाडली. ‘पिस्तुल्या’मध्ये पारधी समाजातील मुलगा, ‘फँड्री’तील जब्याचा मित्र आणि ‘सैराट’मधील आर्चीचा भावाच्या भूमिकेनंतर सुरज खूपच प्रसिद्ध झाला. परंतु, अहमदनगरची ही घटना पाहाता सुरज नक्की काय करतोय असाच प्रश्न पडतोय. 


नागराजच्या आतापर्यंतच्या सर्व चित्रपटात स्थान मिळवलेल्या प्रिन्स अर्थात सुरजसाठी नागराज म्हणजेच आई-बाबा. सुरजला आई-वडील नाहीत. ‘पिस्तुल्या’ केल्यानंतर जवळपास नऊ ते दहा वर्षांचा असल्यापासून तो नागराज यांच्या कुटुंबासोबत पुण्यातच राहतोय. नागराजच्या कुटुंबाने त्याला त्यांच्या घरातील सदस्य बनवून घेतलंय. अनेक वेळा बोलताना सुरज याने अण्णा म्हणजेच नागराज मंजुळे हे माझ्यासाठी सर्वकाही असल्याची  कबुली देखील दिलीय. सुरजचा ‘घर, बंदूक, बिर्याणी’ हा चित्रपट लवकरच येतोय. परंतु, अहमदनगच्या या घटनेने तो अडचणीत आला आहे. सुरजचा या प्रकरणात खरच सहभाग आहे की नाही हे चौकशीनंतरच समोर येईल. परंतु, सध्या तरी त्याच्यावर अटकेची टांगती तलवार आहे हे मात्र नक्की. 


महत्वाच्या बातम्या


Ahmednagar News : ‘सैराट’फेम सुरज पवारला अटक होण्याची शक्यता, फसवणूक प्रकरणी कारवाई होणार