Saif Ali Khan Attacked : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) चाकू हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. घरात शिरलेल्या चोराकडून सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आला. सध्या सैफला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सैफची प्रकृती सध्या स्थिर आहे, मात्र या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. सैफ अली खानसोबत एक कर्मचारी देखील जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिस या घटनेचा कसून तपास करत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती समोर आली आहे. (Saif Ali Khan Attacked)
घरातील कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं
या प्रकरणात पोलिसांनी सैफ अली खानच्या घरातील चार कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती समोर आली आहे. घरात घडलेल्या घटनेची चौकशी करण्यासाठी या चार जणांना ताब्यात घेतलं आहे, त्याचबरोबर त्यांचे फोन देखील ताब्यात घेतले आहे. पोलिस या प्रकरणी चौकशी करण्यासाठी घरातील कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे, त्यांना पोलिस ठाण्यात घेऊन जाण्यात येत आहे. (Saif Ali Khan Attacked)
नेमकं काय घडलं?
बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) सैफ अली खान याच्यावर त्याच्या घरात घुसलेल्या चोरानं चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रात्री अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सैफ अली खान याच्या मुंबईतील घरात बुधवारी रात्री एक चोर शिरला होता. चोराला पाहून सैफच्या घरातील कर्मचाऱ्यांनी आरडाओरड सुरू केला. त्यावेळी सैफ अली खानला जाग आली. खोलीतून बाहेर आल्यानंतर सैफ अली खान आणि चोर आमनेसामने आले. यावेळी चोरानं पकडलं जाण्याच्या भीतीनं त्याच्याकडील चाकूने सैफ अली खानवर सपासप वार केले. यामध्ये सैफ अली खानला दुखापत झाली आहे. त्याला तातडीनं मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सैफ जखमी झाल्यानंतर घरातील नोकरांनी त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. या गोंधळात चोरानं पळ काढला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी या घटनेची गंभीरतेनं दखल घेतली असून चोराला शोधण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेचे पथक कामाला लागलं आहे.
पोलिसांकडून CCTV फुटेजची तपासणी
पोलिसांना हल्ल्याची माहिती मिळताच, त्यांनी सैफच्या घरी धाव घेत तात्काळ चौकशी सुरू केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. सैफच्या आसपासच्या परिसरात दोन ते तीन सीसीटीव्ही आहे. गेटवरही सीसीटीव्ही आहेत. पोलिसांनी तात्काळ सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीच्या आधारे चोराचा माग घेण्यास सुरुवात केली आहे. चोरानं घरात शिरण्यापूर्वी घराची रेकी केली असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, चोरानं केलेल्या हल्यात सैफ अली खान जखमी झाला असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे. पण, अद्याप सैफ अली खानच्या कुटुंबियांकडूनही कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही.