Sachin Pilgaonkar On Ashi Hi Banwa Banwi -2 : बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झालेल्या चित्रपटांचा सिक्वेल येत असतो. सिक्वेलची ही बाब सिनेसृष्टीत फारशी नवी नाही. मराठीतही काही चित्रपटांचे सिक्वेल झाले आहेत. मराठी सिनेसृष्टीत काही एव्हरग्रीन चित्रपटांची निर्मिती झाली आहे. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहेच, शिवाय आजही हे चित्रपट पाहताना धमाल येते. अशा काही चित्रपटांच्या सिक्वेलची प्रतीक्षा चाहत्यांना आहे. मराठी सिनेसृष्टीत मैलाचा दगड ठरलेल्या 'अशी ही बनवाबनवी' ( Ashi Hi Banwa Banwi) या चित्रपटाच्या सिक्वेलची जोरदार चर्चा सुरू असते. आता, यावर दिग्दर्शक-अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांनी भाष्य केले आहे.
'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, अशोक सराफ, सिद्धार्थ रे या चौकटीने प्रेक्षकांना खळखळवून हसवले. सिद्धार्थ रे यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. व्ही. शांताराम यांची निर्मिती असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांनी केले. आजही या चित्रपटाचे डायलॉग चांगलेच प्रसिद्ध आहेत. यातील काही सीन हे मीम टॅम्पलेट होऊन लोकांचे मनोरंजन करतात.
'अशी ही बनवाबनवी'च्या सिक्वेलची इच्छा अनेकांनी व्यक्त केली होती. आता, यावर दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी थेट भाष्य केले आहे. सचिन पिळगावकर यांनी रेडिओ सिटीला दिलेल्या मुलाखतीत 'अशी ही बनवाबनवी'च्या सिक्वेलबाबत भाष्य केले आहे. सचिन यांनी म्हटले की, हा सिनेमा लक्ष्याशिवाय नाही बनू शकत. फक्त लक्ष्या नव्हे तर सुशांतची भूमिका साकारलेला सिद्धार्थदेखील नाही आहे. सुधीर जोशी, वसंत सबनीस, अरुण पौडवाल, शांताराम नांदगावकर असे 'अशी ही बनवाबनवी'च्या टीममधील अनेक लोक आज आपल्यात नाहीत. या सिनेमासाठी या सगळ्यांचं योगदान होतं. त्यामुळे ही मंडळीच नाहीत तर सिनेमा पुढे जाऊ शकत नाही, असे भावूक उत्तर त्यांनी दिले.
सचिन यांनी पुढे म्हटले की, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे 'अशी ही बनवाबनवी'. हा चित्रपट मी बनवलाय, असं मी म्हणूच शकत नाही. हा चित्रपट आम्ही एकत्र येऊन बनवला. आणि लोकांनी तो मोठा केला, असेही सचिन यांनी नमूद केले.
'अशी ही बनवाबनवी' हा चित्रपट एका हिंदी सिनेमावर आधारीत होता. बॉलिवूडमध्ये फ्लॉप झाला तरी मराठी बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगलाच यशस्वी ठरला. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, सिद्धार्थ रे, अश्विनी भावे, निवेदिता सराफ, प्रिया बेर्डे, लीलाबाई काळभोर, विजू खोटे आदी कलाकारांच्या भूमिका होत्या.