Sachin Goswami : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'(Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाची धुरा सांभाळणारे दिग्दर्शक सचिन गोस्वामी (Sachin Goswami) हे कायमच त्यांच्या निखळ विनोदी शैलीमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आलेत. या कार्यक्रमात त्यांनी लिहिलेले जोक असोत किंवा इतकी वर्ष प्रेक्षकांना हसवण्याचं शिवधनुष्यही त्यांनी अगदी लिलया पेललं आहे. त्यातच नुकतच त्यांनी केलेल्या एका पोस्टमुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही. 


सोमवार 20 मे रोजी मुंबईसह 13 मतदारसंघांमध्ये महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडली. लोकसभा निवडणुकांसाठी 20 मे रोजी, मुंबई, ठाणे, नाशिक, दिंडोरी, पालघर, धुळे, कल्याण आणि भिवंडी या मतदारसंघात मतदान पार पडलं. अगदी सामन्यांपासून ते मुख्यमंत्री, अनेक दिग्गज कलाकारांनाही त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. त्याचवेळी दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी देखील त्यांचा हक्क बजावत मतदान केलं. पण जेव्हा ते मतदानासाठी गेले तेव्हा त्यांना त्यांच्या पांढऱ्या केसांमुळे चक्क सिनियर सिटिजन म्हणून वागण्यात आलं. हाच किस्सा सचिन गोस्वामी यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन शेअर केलाय. 


नेमकं काय घडलं?


सचिन गोस्वामी यांनी त्यांच्या फेसबुकवर ही पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की, 'मतदानाला  मी आणि सविता सकाळी 7.30 ला केंद्रावर गेलो..नेमका आमचा नंबर असलेल्या खोली बाहेर मोठी रांग.. ड्युटी वरील पोलीस कर्मचारी मला निरखून बघत अंदाज काढत होता .शेवटी त्याने निष्कर्ष काढला आणि मला म्हणाला.. ओ तुम्ही तिथं का रांगेत? या इकडे इकडून आत जा..मी गडबडलो.. बराच वेळ उभं राहिल्याने पोटऱ्यात गोळे आले होतच..पडत्या फळाची आज्ञा म्हणून तिथं जाऊन थांबलो.. आता मी ३नंबर वर होतो..हळूच त्यांच्या कडे पाहून हसत थँकयू म्हटल.. त्यावर तो म्हणाला ओ, सिनियर सिटिझन रांगेत चक्कर येऊन पडले तर डोक्याला ताप आम्हालाच होणार नाही का?.. पांढऱ्या केसांनी सिनियर सिटिझन कॅटेगरीत आणलं आहे.. काय करावं...'



सचिन गोस्वामी यांच्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस


दरम्यान सचिन गोस्वामी यांच्या पोस्टवर अनेक मजेशीर कमेंट्सही आल्या आहेत. एकाने कमेंट करत तर हा स्किटचा विषय असल्याचंही म्हटलं आहे. तर दुसऱ्याने कमेंट करत म्हटलं की, यावर चौघुलेंना घेऊन एक मजेशीर स्किट होऊन जाऊद्या. दरम्यान मतदानाच्या प्रक्रियेवेळी ज्येष्ठ नागरिकांना मतदानाच्या रांगेत उभं न करता त्यांना मतदान करण्यासाठी प्राधान्य दिलं जात होतं. सचिन गोस्वामी यांच्या पांढऱ्या केसांमुळे त्यांना ज्येष्ठ नागरिक समजून रांगेत पुढे जाऊन दिलं. 


ही बातमी वाचा : 


Shah Rukh Khan Hospitalized: कोलकाताच्या विजयाचा जल्लोष; शाहरुख खान दुसऱ्याच दिवशी रुग्णालयात दाखल