Riteish Deshmukh On Vilasrao Deshmukh Biopic : मागील काही वर्षात रुपेरी पडद्यावर कलाकार, राजकीय नेते यांचा जीवनपट उलगडून दाखवणारे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या चित्रपटांना सिनेरसिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. आता, मराठी सिनेसृष्टीत आणखी एका राजकीय नेत्याचा जीवनपट रुपेरी पडद्यावर येणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडलेले विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचा आज स्मृतीदिन आहे. विलासराव देशमुख यांचा धाकटा लेक आणि अभिनेता-निर्माता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याने त्यांच्या आठवणीत एक भावूक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तर, दुसरीकडे दिवंगत विलासराव देशमुख यांचा जीवनपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे.
राजकारणातले राजहंस अशी ओळख असणाऱ्या विलासराव देशमुख यांची भाषण शैली आणि शब्दांवर असलेली पकड याची भुरळ सामान्यांना पडत असे. विलासराव देशमुख हे विरोधी पक्षातही लोकप्रिय होते. सरपंच म्हणून राजकीय प्रवासाला सुरुवात केलेल्या विलासरावांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद ते केंद्रीय मंत्री असा प्रवास केला. विलासराव देशमुख यांचा जीवनपट उलगडून दाखवणाऱ्या चित्रपटांची प्रतीक्षा त्यांच्या चाहत्यांना आहे.
रितेश देशमुखने काय म्हटले?
काही दिवसांपूर्वीच रितेश देशमुख याने 'मुंबई टाइम्स'ला मुलाखत दिली होती. यावेळी त्याला विलासराव देशमुख यांच्या बायोपिकबाबत विचारण्यात आले. त्यावेळी बोलताना रितेशने सांगितले की, "मी स्वतः तसा विचार केलेला नाही. परंतु, मध्यंतरी काही जण माझ्याकडे सिनेमाच्या स्क्रिप्ट घेऊन आले होते. 'आम्ही स्क्रिप्ट लिहितो. तुम्ही त्यावर सिनेमा करा" अशीही विचारणा झाली, पण मी त्याबाबत ठोस काही ठरवेललं नाही. योग्य वेळी त्याचा विचार नक्की करेन, असे रितेशने सांगितले.