Vidhan Sabha Election 2024 : सोलापूर : लोकसभेला (Lok Sabha Election 2024) सोलापूर (Solapur News) जिल्ह्यातील माढा (MADHA) आणि सोलापूर (Solapur) या दोन्ही लोकसभा जागा जिंकून देणाऱ्या मोहिते पाटील (Mohite Patil) कुटुंबाच्या सल्ल्यानंच विधानसभेच्या (Vidhan Sabha Election 2024) जिल्ह्यातील उमेदवारांची निवड होणार असल्याचे स्पष्ट संकेत खासदार सुप्रीया सुळे (Supriya Sule) यांनी दिले आहेत. त्यामुळे सोलापुरातील घडामोडींना वेग आला आहे. खुद्द सुप्रीया सुळेंनी सोलापूर आणि माढा विधानसभेची सूत्र मोहिते पाटलांकडे दिल्यामुळे आता विजयदादा काय निर्णय घेणार? याकडे लक्ष लागलं आहे. 


राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या (NCP Supriya Sule) खासदार सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यानंतर आता पुन्हा सोलापूर जिल्ह्याच्या सत्तेची सर्व सूत्रं मोहिते पाटील कुटुंबाकडे येणार हे नक्की झालं आहे. शिवस्वराज यात्रेसाठी आलेल्या सुप्रिया सुळे यांनी सोलापूर जिल्ह्यात याबाबत स्पष्ट संकेत देताना विधानसभा निवडणुकीत उमेदवार कोण असावा? याबाबत शरद पवार आणि जयंत पाटील हे विजयदादा यांच्या सल्ल्यानंतरच निर्णय घेणार असल्याची स्पष्टोक्ती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. आता मोहिते पाटील यांचा निर्णय विधानसभा उमेदवारीसाठी अंतिम ठरणार हे नक्की झालं आहे. 


गेल्यावेळी सर्व एकत्र लढत असताना एखादा उमेदवार मिळवायला अडचणी येत होत्या, पण आता पक्ष फुटल्यानंतर देखील एकएका मतदारसंघात 5 ते 6 इच्छुक उमेदवारांची गर्दी होऊ लागल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पक्ष फुटल्यावर पत्रकार विचारायचे, आता कसं होणार पण कोण गेल्यानं काही थांबत नसतं, आईशिवाय मूल देखील राहतं, असं सांगत आता नव्या दमाचे उमेदवार उभे करू आणि त्यांना शून्यातून विश्व निर्माण करायला लावू, असा टोला सुप्रिया सुळे यांनी फुटिर गटाला लगावला आहे. यावेळी विधानसभेला महाविकास आघाडीचे उमेदवार निवडताना विजयदादा यांचा सल्ला घेऊनच उमेदवार दिले जाणार, असं स्पष्ट करत पुन्हा एकदा मोहिते पाटील यांच्या हातात जिल्ह्याची संपूर्ण सूत्रं असतील असे स्पष्ट संकेत दिले आहेत. 


मोहिते पाटील यांनी 2019 लोकसभेला भाजपला साथ दिल्यानं माढा लोकसभेत भाजपचा विजय झाला होता. यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधानपरिषदेचं बक्षिस देखील दिलं. मात्र नंतर गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं धैर्यशील मोहिते पाटील यांना डावलून निंबाळकर यांना उमेदवारी दिली आणि मोहिते पाटील यांनी तुतारी हातात घेत माढाही जिंकलं. एवढंच नाहीतर सांगून सोलापूरची जागाही भाजपच्या हातून काढून घेतली होती. आता नाही म्हणायला रणजितसिंह मोहिते हे तांत्रिक दृष्ट्या भाजपचे आमदार असले, तरी मोहिते पाटील कुटुंबानं शरद पवार यांची साथ दिली आहे. त्यामुळे आता शरद पवार गटानं सर्व ताकद मोहिते पाटील यांच्या हातात देताना भाजपसाठी मात्र मोहिते पाटील हे धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं, असं समीकरण बनलं आहे.