Anand Bakshi Death Anniversary : आपल्या सदाबहार गाण्यांनी लोकांना वेड लावणारे बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांनी जवळपास चार दशके सर्वांच्या मनावर राज्य केलं. चित्रपट गीतकार आनंद बक्षी यांचे 2002 मध्ये वयाच्या 72 व्या वर्षी निधन झाले. आनंद बक्षी याची आज (30 मार्च) पुण्यतिथी आहे. चला तर त्यांच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेऊ...


आनंद बक्षी यांचे वडील रावळपिंडीत बँक मॅनेजर होते. लहान वयातच आनंद टेलिफोन ऑपरेटर म्हणून सैन्यात भरती झाले. मात्र त्यांची इच्छा मुंबई येऊन चित्रपटसृष्टीत काम करण्याची होती. 1947 साली फाळणीनंतर बक्षी कुटुंब निर्वासित म्हणून भारतात आले. त्यावेळी मायानगरी मुंबईत येऊन त्यांनी चित्रपटात काम मिळावं म्हणून धडपड सुरू केली. मात्र त्यांना काम मिळालं नाही. यानंतर ते पुन्हा सैन्यात दाखल झाले आणि काही काळ तेथे कार्यरत राहिले.


तीन वर्षे सैन्यात सेवा दिल्यानंतर त्यांनी ठरवलं की, आपल्या जीवनाचा उद्देश गीत लिहिणे आहे, बंदूक चालवणे नाही. आपल्या चित्रपट कारकिर्दीत बक्षी यांनी 4000 हून अधिक गाणी लिहिली. 1957 मध्ये त्यांना पहिल्यांदा गीत लिहिण्याची संधी मिळाली. मात्र ते गीत इतकं प्रसिद्ध झालं नाही. यानंतर 1963 मध्ये अभिनेता आणि दिग्दर्शक राज कपूर यांनी त्यांना आपला चित्रपट 'मेंहदीं लगे मेरे हाथ' मध्ये गीत लिहण्याची संधी दिली. या चित्रपटाचे गीत इतके लोकांना आवडले की, त्यानंतर यशाने आनंद बक्षी यांची साथ कधीच सोडली नाही.


'आराधना', 'अमर प्रेम' आणि 'कटी पतंग' सारखे चित्रपट आनंद बक्षी यांच्या कारकिर्दीतील सुरुवातीला मैलाचा दगड ठरले. याच चित्रपटातील गीतांच्या जोरावर राजेश खन्ना भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार बनले. आनंद बक्षी यांनी चित्रपट निर्मात्यांच्या अनेक पिढ्यांसोबत काम केलं. काळानुसार त्यांच्या गीतांचे शब्द आणि टोन बदलत राहिला हा त्यांचा सर्वात मोठा गुण होता.


वर्ष 1965 मध्ये 'जब जब फूल खिले' प्रदर्शित झाला, तेव्हा त्यांची 'परदेसियों से न अंखियां मिलाना', 'ये समां.. समां है ये प्यार का', 'एक था गुल आणि एक थी बुलबुल' ही गाणी खूप गाजली. यानंतर चित्रपटसृष्टीत हिट गीतांची गॅरंटी म्हणजे आनंद बक्षी अशी त्यांची ओळख निर्माण झाली. त्यांचे अनेक गीत आजही प्रेक्षांच्या आपल्या मनाचा ठाव घेत आहेत.


संबंधित बातम्या: 


Firaq Gorakhpuri: जेव्हा मीना कुमारी यांना पाहताच फिराक गोरखपुरी यांनी मुशायरा सोडला, वाचा काय आहे किस्सा...