IPL 2022, GT vs LSG : अष्टपैलू दीपक हुड्डा आणि आयुष बडोनी यांच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावार लखनौ संघाने निर्धारित 20 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात 158 धावा केल्या आहेत. गुजरात संघाला विजयासाठी 159 धावांचे आव्हान देण्यात आले आहे. मोहम्मद शमीच्या भेदक माऱ्यानंतर लखनौ संघाचा डाव कोसळला होता. आघाडीची फळी कोसळल्यानंतर दीपक हुड्डा आणि आयुष बडोनी यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावार लखनौ संघाने सन्माजनक धावसंख्या उभारली. दीपक हुड्डाने आपल्या अर्धशतकी खेळीत 2 षटकार आणि सहा चौकार चोपले. तर आयुष बडोनी याने तीन षटकार आणि चार चौकार लगावले. बडोनीने 41 चेंडूत ताबडतोड 54 धावांची खेळी केली.  गुजरातकडून शमी सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला आहे. शमीने तीन विकेट घेतल्या. तर वरुण वरुण अरोन याने दोन विकेट घेतल्या. तर  राशिद खानला एक विकेट मिळाली.  हार्दिक पांड्या आणि लॉकी फर्गुसन यांची विकेटची पाटी कोरीच राहिली.


आघाडीची फळी कोलमडली –
गुजरात संघाच्या भेदक माऱ्यापुढे लखनौ संघाची आघाडीची फळी कोलमडली. कर्णधार राहुलला खातेही उघडता आले नाही.  तर डिकॉक सात धावा काढून माघारी परतला. लुईसने 10 तर मनिष पांडे अवघ्या सहा धावा काढून बाद झाले. आघाडीच्या एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही.


दीपक हुड्डा आयुष बडोनी यांनी डाव सावरला –
आघाडी फळी कोलमडल्यानंतर अष्टपैलू दीपक हुड्डा आणि आयुष बडोनी यांनी लखनौचा डाव सावरला. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 68 चेंडूत 87 धावांची भागिदारी केली. दीपक हुड्डाने 41 चेंडूत 55 धावांची खेळी केली. तर आयुष बडोनी यानेही दणक्यात पदार्पण केले. आयुषने पदार्पणाच्या सामन्यात दबावाखाली खणखणीत अर्धशतक झळकावले. आयुषने अवघ्या 38 चेंडूत 54 धावांची खेळी केली.  


शमीचा भेदक मारा –
मोहम्मद शामीच्या भेदक माऱ्यामुळे बलाढ्या लखनौची फलंदाजी कोलमडली. शामीने पहिल्याच चेंडूवर कर्णधार के. राहुलला बाद करत लखनौला पहिला धक्का दिला. त्यातून लखनौचा संघ सावरलाच नाही. त्यानंतर शमीने डि कॉक आणि मनिष पांडे यांनाही बाद करत लखनौची आघाडी फळी मोडून काढली. मोहम्मद शमीने चार षटकात 29 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट घेतल्या.


हार्दिकची गोलंदाजी –
गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने गोलंदाजी केली. मागील काही दिवसांपासून हार्दिकच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होता. टी20 विश्वचषकानंतर हार्दिकला टीम इंडियातही स्थान मिळाले नव्हते. दुखापतीनंतर हार्दिक पांड्याने गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. हार्दिकने चार षटके गोलंदाजी केली. चार षटकांत हार्दिकला एकही विकेट मिळाली नाही. हार्दिकने चार षटकांत 37 धावा दिल्या.