Ranya Rao Arrested At Airport: कन्नड अभिनेत्री (Kannada Actress) रान्या राव हिला बंगळुरूच्या (Bengaluru) कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Kempegowda International Airport) अटक करण्यात आली आहे. सोन्याच्या तस्करीच्या आरोपाखाली सोमवारी (4 मार्च 2025) विमानतळावर अभिनेत्रीला अटक करण्यात आली. अभिनेत्रीची झडती घेतल्यानंतर, तिच्याकडून 14.8 किलो सोनं जप्त करण्यात आलं, त्यानंतर डायरेक्टोरेट ऑफ रेवेन्य इंटेलिजेंसनं तिला अटक केली.
पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री रान्या रावला अटक केल्यानंतर तिला आर्थिक गुन्हे न्यायालयात हजर करण्यात आलं. हजर झाल्यानंतर अभिनेत्रीला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रान्या राव दुबईहून एमिरेट्सच्या विमानानं भारतात आली असून तिनं कपड्यांमधून लपवून 14.8 किलो सोनं आणल्याचा आरोप आहे.
कपड्यांमधून लपवून आणलं सोनं
तपासानंतर असंही म्हटलं जात आहे की, रान्या राव मोठ्या प्रमाणात सोनं घालून आणि कपड्यांमध्ये सोन्याची बिस्किटं लपवून दुबईहून सोन्याची तस्करी करत होती. वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, पोलीस रान्या रावच्या वारंवार होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सहलींवर लक्ष ठेवून होतं. ही अभिनेत्री 15 दिवसांत चार वेळा दुबईला गेली होती. त्यामुळे पोलिसांना तिच्यावर संशय आला आणि संधी मिळताच त्यांनी अभिनेत्रीवर कारवाई केली.
मोठ्या स्मगलिंग नेटवर्कचा हिस्सा रान्या?
प्राथमिक तपासात असंही समोर आलं आहे की, कस्टम इन्वेस्टिगेशन टाळण्यासाठी रान्यानं शिफारसींचा वापर केला असावा. तिनं कर्नाटकच्या डीजीपीची मुलगी असल्याचा दावा केला आणि स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांमुळे ती सहज घरी पोहोचली असल्याचं बोललं जात आहे. आता पोलीस तपास करत आहेत की, या सोन्याच्या तस्करीत रान्या ही एकटीच सहभागी आहे की, ती दुबई आणि भारतादरम्यान चालणाऱ्या मोठ्या स्मगलिंग नेटवर्कचा भाग आहे.
कोण आहे रान्या राव?
रान्या राव 'माणिक्य' (2014) या चित्रपटासाठी ओळखली जाते. या चित्रपटात ती कन्नड सुपरस्टार सुदीपसोबत दिसली. ही अभिनेत्री कर्नाटकातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी के. रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. के. रामचंद्र राव हे कर्नाटक राज्य पोलीस गृहनिर्माण महामंडळात डीजीपी म्हणून कार्यरत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :